“मुग्धा, ऐक ना.. संध्याकाळच्या प्लॅनबद्दल थोडं बोलायचं होतं..” पलिकडून अपूर्वाचा फोन होता…
“हा बोल ना…” मुग्धानं उत्तर दिलं…
“ए आज मी संध्याकाळी नाही येऊ शकत.. प्लीज सॉरी यार.. मिटिंग्ज थोड्या लांबल्या आहेत.. दरवर्षी मी येते ना.. प्लीज खूप महत्त्वाच्या मिटिंग्ज आहेत.. प्लीज समजून घे ना…”
“इट्स ओके.. मी आणि स्वानंद मिळून सेलिब्रेट करु.. नो प्रॉब्लेम…” मुग्धानं अगदी शांतपणे उत्तर देऊन फोन ठेवला..
मुग्धाच्या नवऱ्याचा म्हणजेच स्वानंदचा आज वाढदिवस… स्वानंदच्या सगळ्या मित्र परिवाराला बोलावून सरप्राईज द्यायचा मुग्धाचा विचार होता… मात्र, अनेकांची महत्त्वाची कामं असल्यानं जवळपास हा संपूर्ण प्लॅन पाण्यात गेला होता.. पण, “आपण दोघे आहोत ना एकमेकांसाठी.. कोणी कशाला हवंय मग..?”, असं स्वानंद कायम म्हणत असल्यानं मुग्धा शांत होती.. त्यामुळंच अपूर्वासोबत मुग्धा इतक्या नरमाईनं बोलली..
स्वानंद आणि मुग्धा म्हणजे अगदी मेड फॉर इच अदर… हे दोघे एकमेकांसोबत असले की एकदम खूश.. सोबत असणं हेच त्यांच्या आनंदाचं कारण.. कॉलेजमध्ये असल्यापासून अफेअर… इतरांची अफेअर्स कॉलेजमध्ये सुरू होऊन संपलीदेखील.. यांचं मात्र अतूट राहिलं.. खूप भांडायचे.. त्यामुळं ब्रेकअप पॅचअॅप तर अनेकदा व्हायचं.. “अरे तुम्ही दोघे नाही राहू शकत एकमेकांशिवाय… त्यामुळं उगाच भांडू नका.. तुम्ही कधीही कायमस्वरुपी वेगळे होऊ शकणार नाही… उगाच त्या काही सेकंदाच्या रागात ब्रेकअप करु नका”, असं जवळच्या अनेकांनी दोघांना सांगितलं… तेव्हापासून स्वानंद आणि मुग्धा एकत्र आले, ते कायमचे..
आज बर्थडे बॉय स्वानंदसाठी काय करायचं, याचा विचार मुग्धा करत होती… स्वानंद तसा क्रिएटिव्ह माणूस… काहीतरी वेगळं करायचं… हे त्याला नेहमी वाटायचं… त्यामुळं मुग्धाला त्यानं अनेक क्रिएटिव्ह गिफ्ट्स दिली होती… एकदा मुग्धाला स्वानंदनं एका मोठ्या बाटलीत छोट्या छोट्या बाटल्या टाकून, त्या छोट्या छोट्या बाटल्यांमधून छोटे छोटे मेसेज दिले होते.. लिखाण हा तर स्वानंदचा आवडता विषय.. त्यामुळं स्वानंदला छोटंसं पत्र लिहायचं, असं मुग्धानं ठरवलं.. ऑफिसमधली कामं पटापटा आटोपून मुग्धानं स्वानंदसाठी पत्र लिहिलं.. हे पत्र वाचून “तू ना खरंच वेडी आहेस.”, असं स्वानंद म्हणणार याची मुग्धाला खात्री होती..
ऑफिस संपल्यावर मुग्धाला ऑफिसची बस भाईंदरपर्यंत ड्रॉप करायची… तिथून मग विरारच्या घरापर्यंत मुग्धा ट्रेननं जायची.. खरंतर यामध्ये मुग्धाला त्रास व्हायचा.. मात्र स्वानंदनं वयाच्या २४ व्या वर्षी घेतलेल्या त्या घराबद्दल मुग्धाला प्रचंड आपलेपणा वाटायचा… आपण दोघांनी विरारच्या घरी राहायचं, हवं तर थोड्या वर्षांनी मिळून मुंबईत घर घेऊ, असं स्वानंदचं मत होतं.. त्यामुळं स्वानंदसाठी मुग्धा आनंदानं आधी बस आणि मग ट्रेन असा प्रवास करायची.. ऑफिस सुटल्यावर मुग्धा नेहमीप्रमाणे बसमध्ये बसली. बसनं ऑफिसचा परिसर सोडला आणि मुग्धा भूतकाळात हरवून गेली..
कॉलेजमधली पहिली भेट… होकार दिलेला नसतानाही स्वानंदनं सेलिब्रेट केलेला व्हॅलेंटाईन डे, भेटायला येताना तो आणत असलेली गुलाबाची फुलं… मॉर्निंग शिफ्ट संपल्यावरही फक्त मुग्धाचं ऑफिस संध्याकाळी सुटतं म्हणून स्वत:च्या ऑफिसमधून लेट निघणारा स्वानंद… मुग्धाला ट्रॅफिकमुळे कितीही उशीर झाला तरी न कुरकुरता वाट पाहणारा स्वानंद… आपल्या लाडक्या नवऱ्याची प्रत्येक आठवण मुग्धाच्या मनात होती…
मुग्धा आणि स्वानंदचं लग्नदेखील अगदी हटके होतं… त्यांच्या लग्नाला कोणीच नव्हतं… किंबहुना स्वानंद आणि मुग्धाचं लग्न झालंय, हेदेखील अनेकांना माहिती नव्हतं.. कारण मुग्धानं हट्टानं स्वानंदसोबत लग्न केलं होतं… आणि तेदेखील चक्क हॉस्पिटलमध्ये…
………………………………
काही वर्षांपूर्वी स्वानंदची तब्येत खूप बिघडली होती.. तू लवकर बरा होणार, असं स्वानंदला डॉक्टरांनी सांगितलं होतं… तसा स्वानंद बरादेखील होत होता… मात्र मुग्धानं स्वानंदकडं आत्ताच लग्न करु, असा हट्ट धरला… ना कोणते मंत्र, ना मंगळसूत्र, ना फेरे.. मात्र बिन फेरे हम तेरे, असं म्हणत स्वानंद आणि मुग्धानं लग्न केलं… आता याला जग कदाचित लग्न म्हणणार नाही… पण एकमेकांचं जग असलेल्या स्वानंद आणि मुग्धाला त्याची फिकीर नव्हती… आधी काय हा वेडेपणा, असं म्हणत स्वानंदनं मुग्धाचा हा हट्ट सुद्धा पूर्ण केला…
मुग्धाच्या ऑफिसची बस भाईंदरला पोहोचली होती… यापुढचा प्रवास मुग्धाला लोकलनं करायचा होता… नेहमी प्रेमानं छान टवटवीत गुलाबं आणणाऱ्या स्वानंदसाठी आज मुग्धानं स्टेशनजवळून सुंदर गुलाब घेतले… कधी एकदा स्वानंदसोबत त्याचा बर्थ सेलिब्रेट करतेय, असं मुग्धाला झालं होतं… बर्थडेला कोणीच येणार नसल्यानं स्वानंद आणि मुग्धाला प्रायव्हसी मिळणार होती… आधी स्वानंदला गुलाब द्यायचा, मग मस्त केक कटिंग, त्यानंतर लिहिलेल्या पत्राचं वाचन, मग जेवण असा मस्त बेत मुग्धानं आखला..
विरारला उतरल्यावर मुग्धानं स्वानंदचा फेव्हरेट चॉकलेट केकदेखील घेतला… ‘हॅप्पी बर्थडे हबी’ असं केकवर लिहिलं होतं.. स्वानंदचं हे सर्वात फेव्हरेट नाव… अगदी कॉलेजपासूनच… बॉयफ्रेंड हे नातं लवकर संपेल कदाचित… पण हबी कसं छान वाटतं… म्हणून मुग्धा स्वानंदला हबीच म्हणायची… मुग्धा बिल्डिंगमध्ये शिरली… शेजारी राहणाऱ्या काकू खालीच दिसल्या… ‘अरे आज केक?’ असा प्रश्न त्यांनी विचारला… “हो… आज स्वानंदचा बर्थडे ना…” असं छान उत्तर देत मुग्धा लिफ्टमध्ये शिरली… काकू मुग्धाच्या उत्तरावर काहीच म्हणाल्या नाहीत. मुग्धाला त्याकडं लक्ष द्यायला वेळ नव्हता.. ती पटकन लिफ्टमध्ये शिरली. लिफ्ट १२ व्या मजल्यावर थांबली.. मिस्टर अॅण्ड मिसेस स्वानंद अशी पाटी असणारा दरवाजा मुग्धानं उघडला..
कॉलेजपासून काढलेले स्वानंदसोबतचे फोटो अगदी हॉलभर लावलेले होते.. हॉस्पिटलमधल्या लग्नाचा सेल्फीदेखील त्यामध्ये होता… मुग्धानं केक ठेवला… स्वानंदला हाक मारली.. मुग्धानं स्वानंदला गुलाब दिला… मग दोघांनी मस्त केक कट केला… आता मुग्धानं अगदी प्रेमानं लिहिलेलं पत्र वाचायला सुरुवात केली..
“हॅप्पी बर्थडे हबी, २७ व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा… आपण खरंतर ३० वर्षांचे झाल्यावर लग्न करणार होतो.. मात्र माझ्या हट्टामुळं थोडं लवकर झालं लग्न.. त्या दिवशी लग्न केलं तेव्हा तू म्हणाला होतास हा काय वेडेपणा…? पण माझ्या त्याही वेडेपणात तू मला साथ दिलीस.. त्याबद्दल थँक्यू…”, मुग्धा पत्र वाचताना स्वानंद तिच्याकडं पाहून गोड हसत होता..
“पण त्यावेळी तो वेडेपणा गरजेचा होता… कारण तुला माहित नसेल, पण मला माहित होतं की तू फक्त काही तास माझ्यासोबत आहेस… तू माझं विश्व होतास वेड्या… आजही आहेस आणि कायम राहशील… तुला माहितीय… या घरात आपण राहावं, छान संसार असावा, असं तुझं स्वप्न होतं… त्यादिवशी हॉस्पिटलमध्ये तू अखेरचा श्वास घेतलास… पण तू आजही मला जाणवतोस… माझ्यात, या आपल्या घरात… म्हणूनच इथून कुठेही जावंसं वाटतं नाही… हॅप्पी बर्थडे हबी… असाच कायम राहा माझ्यासोबत आयुष्यभर… तुझं असं असणंच आता माझ्यासाठी सर्वकाही आहे…” मुग्धाचं पत्र वाचून झालं होतं… समोर स्वानंदचा फोटो होता… स्वानंद गोड हसत त्याच्या मुग्धाकडं पाहात होता..
– तीन फुल्या, तीन बदाम
© सर्व हक्क सुरक्षित