News Flash

मोदं कारयति!

आपल्या समाजात देवांप्रमाणेच देवीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे.

गेली सहा वर्षे ‘लोकप्रभा’ गणेश विशेषांकाच्या माध्यमातून आपण गणपतीचा ऐतिहासिक, तात्त्विक, पुरातत्त्वीय, सामाजिक, धार्मिक  अंगांनी शोध घेतला. गतवर्षी तर सर्वात प्राचीन असलेल्या अफगाणिस्तानात सापडलेल्या पहिल्या गणेशप्रतिमेचा अर्थात ‘महाविनायका’चा शोध घेतला. आजवर डॉ. गेट्टी, पॉल मार्टिन दुबोस, डॉ. म. के. ढवळीकर यांच्यासारख्या पुराविदांनी गणेशाचा शोध घेतला आहे. मात्र दैवतशास्त्राच्या अंगाने त्यावर फारच कमी अभ्यास झाला आहे.

गणपतीच्या अभ्यासात दोन महत्त्वाच्या बाबी प्रकर्षांने लक्षात येतात. त्यातील पहिली म्हणजे सुरुवातीच्या अनेक शतकांमध्ये त्याचा उल्लेख सर्वत्र ‘विनायक’ या नावाने आढळतो. काही शतकांनंतर तो ‘गणेश’ होतो. सुरुवातीस यक्ष म्हणून पुजला जाणारा विनायक हा विघ्नकर्ता असतो आणि नंतर त्याच्यामध्ये बदल होत तो विघ्नहर्ता होतो. त्यानंतर त्याची लोकप्रियता तुफान वाढलेली दिसते. सुरुवातीच्या काळात ५-६ व्या शतकांत तो अनेक ठिकाणी उपदेवता म्हणूनच आलेला दिसतो. कधी बुद्धासोबत, कधी जैन देवतांसोबत, तर कधी शिव-पार्वतीसोबत. सुरुवातीचे त्याचे उल्लेख हे कोपणाऱ्या देवतेला लागू होणारे आहेत. म्हणजे कोपल्यानंतर विघ्न आणि खूश झाल्यास भक्ताला काहीच कमी न पडू देणारे असे त्याचे वर्णन येते. मात्र नंतर मध्ययुगामध्ये सुमारे १० व्या शतकाच्या आसपास ही देवता आगम परंपरेत देवता म्हणून प्रवेश करते आणि त्यानंतर या देवतेच्या लोकप्रियतेमध्ये प्रचंड वाढ झालेली दिसते. या देवतेचा स्वतंत्र गाणपत्य संप्रदाय अस्तित्वात येतो, पुराणे अस्तित्वात येतात आणि स्वतंत्र तत्त्वज्ञानही विकसित होते. पूर्वी विघ्नकर्ता असलेली ही देवता नंतर विघ्नहर्ता होताना, ती षड्रिपूंवर विजय मिळविण्यात मदत करणारी महत्त्वपूर्ण देवता म्हणून विकसित होताना दिसते. हा तोच कालखंड आहे ज्या वेळेस यवनी आक्रमणांना १३ व्या शतकात सुरुवात झाली होती. त्या वेळेस मग अशा या विघ्नहर्त्यांला लोकप्रियता आणि लोकाश्रय न लाभता तर नवलच होते.

सुरुवातीस स्वतंत्र मात्र निम्न स्तरातील गण- यक्ष, नंतर शंकर-पार्वतीच्या कुटुंबात दंतकथांच्या माध्यमातून झालेला प्रवेश आणि आगम संप्रदायामध्ये समाविष्ट झाल्यानंतर इतर देवतांना आलेले गौणत्व आणि गणपतीला प्राप्त झालेले महत्त्व या गोष्टी समाज कसा बदलत जातो आणि समाजाच्या मानसिकतेनुसार दैवतीकरण कसे कमी-अधिक प्रभावशाली ठरते, आजूबाजूची प्राप्त परिस्थिती त्याला आकार देण्यात किती मोलाची भूमिका बजावते, हे समाजशास्त्रज्ञांनी समजून घेणे महत्त्वाचे आहे.

आपल्या समाजात देवांप्रमाणेच देवीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. साधारणपणे १०-१३ व्या शतकाच्या दरम्यान सिद्धिविनायक ही कल्पना विकसित आणि लोकप्रिय झालेली दिसते. यात सिद्धी-बुद्धी गणेशासोबत येतात. यातील महत्त्वाचा भाग असा की, देवीची तीन रूपे ही प्रमुख मानली जातात. त्यातील पार्वती ही त्याची आई आहे. बुद्धी म्हणजे सरस्वती ही ब्रह्मदेवाशी संबंधित आहे. सिद्धी म्हणजेच लक्ष्मी ही विष्णुपत्नी आहे. अशा प्रकारे देवीची तिन्ही रूपे गणेशाशी जोडली जातात आणि मग गणपती ही देवांतील सर्वात प्रभावी अशी देवता होते. मग आई-वडील असलेले शंकर-पार्वती, जगाचे चालन-पालन करणारे विष्णू-लक्ष्मी आणि निर्मिती करणारे ब्रह्मदेव गणेशाचीच याचना करताना पाहायला मिळतात. या बदलाचा कालखंड १३ व्या शतकाच्या आसपासचा आहे. याच काळात मग गणेशाची गाथा, महती सांगणारी पुराणे आणि तत्त्वज्ञान अस्तित्वात येते. हा तोच कालखंड आहे की, ज्या वेळेस भारतातून बौद्ध तत्त्वज्ञान ऱ्हास होण्याच्या मार्गावर होते, जैन तत्त्वज्ञान मर्यादित होते आणि मग अशा वेळेस दक्षिणेत याचा भाऊ असलेला मुरुगन (कार्तिकेय) आणि तो स्वत:; तर उत्तरेत गणपती हा प्रमुख देवता ठरतो. त्याचा स्वतंत्र संप्रदाय फोफावतो. अष्टविनायक हा त्या फोफावण्याचाच ढळढळीत पुरावा आहे.

गणपतीचे एक दुसरे महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे तो इतर कोणत्याही देवतेला विरोध करत नाही किंवा गौणत्व देत नाही. तो सर्वासाठीच विघ्नहर्ता आहे. त्यामुळेच बौद्ध, जैन आणि हिंदूू या सर्वच संप्रदायांमध्ये त्याचे अस्तित्व आणि चित्रण प्राचीन काळापासून पाहायला मिळते, तर अर्वाचीन काळात मुस्लीम आणि पारशी बांधवांचाही समावेश त्याच्या भक्तगणांमध्ये झालेला दिसतो. अशा या गणरायाचा विविध अंगांनी शोध घेण्याचा अभ्यासपूर्ण प्रयत्न ‘लोकप्रभा’ने याही वर्षी केला आहे. या खेपेस विशेषांकामध्ये आनंद कानिटकर यांनी शिलालेखांच्या आधारे घेतलेला गणपतीचा शोध महत्त्वाचा ठरावा. आजपर्यंत अशा प्रकारे शिलालेखांच्या आधारे साकल्याने गणपतीचा शोध कुणीही घेतलेला नाही. पुरातत्त्वज्ञ डॉ. गो. बं. देगलुरकर यांनी गणरायाच्या विविध रूपांचा त्याच्या तत्त्वज्ञानाच्या आधारे शोध घेतला आहे, तर अष्टविनायकाचे पुरातत्त्वीय महत्त्व डॉ. मंजिरी भालेराव यांनी रेखाटले आहे. मूर्तिमंत गणेश आशुतोष बापट यांनी उभा केला आहे. याशिवाय तेवढेच महत्त्वाचे इतर लेखही आहेतच.

गणरायाचा आवडता नैवेद्य म्हणजे मोदक. मोदं कारयति म्हणजे ज्याच्यामुळे मोद म्हणजेच आनंद मिळतो तो!

त्याचा हा आनंदमयी उत्सव साजरा करताना ज्ञानाच्या आधारे या ज्ञानदेवतेचा शोध घ्यावा, यासाठीच हा खटाटोप.


विनायक परब
@vinayakparab
vinayak.parab@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 18, 2017 1:09 am

Web Title: lokprabha gash vishesh 2017 in search of ganesha
Next Stories
1 स्वातंत्र्याचं मोल!
2 सरकारची बनियागिरी!
3 चौकटीतील आव्हाने!
Just Now!
X