पहिल्या टप्प्यात शीव उड्डाणपुलाला ३२ नवे ‘बेअरिंग’
सुहास जोशी, लोकसत्ता
मुंबई : ठाणे, पूर्व उपनगरे आणि नवी मुंबईतून शहरात प्रवेश करण्यासाठी असलेल्या अत्यंत महत्त्वाच्या अशा शीव उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू असून, पहिल्या टप्प्यात ३२ बेअरिंग बदलण्यात आले. उड्डाणपुलाचे जुने बेअरिंग काढण्यास वेळ लागत असल्यामुळे निर्धारित वेळेपेक्षा एक दिवस अधिक पुलावरील वाहतूक बंद ठेवावी लागली.
पहिल्या टप्प्यात पाच दिवसांत पुलाच्या चुनाभट्टी दिशेच्या भागातील ३२ बेअरिंग बदलण्यात आले. बेअरिंग बदलण्यासाठी पूर्वीचे बेअरिंग काढावे लागतात. हे बेअरिंग जुने झाल्याने ते काढण्यास अपेक्षित वेळेपेक्षा अधिक वेळ लागला, तर काही ठिकाणी ते काढणे अशक्य झाले. अखेरीस कापूनच ते बेअरिंग काढावे लागल्याचे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
जुने बेअरिंग काढणे आणि नवीन बसवणे यातील अडचणीवर तोडगा काढल्यामुळे पुढील टप्प्यातील काम तुलनेने अधिक वेगाने होईल असे महामंडळाचे मुख्य अभियंता शशिकांत सोनटक्के यांनी सांगितले. मुंबईतील उड्डाणपुलाचे बेअरिंग बदलण्याचे काम प्रथमच करण्यात येत आहे. हे काम ६ एप्रिलपर्यंत सुरू राहणार असून, प्रत्येक आठवडय़ात चार दिवस (शुक्रवारी रात्री १० ते सोमवार सकाळी ६ पर्यंत) उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद राहील. त्यानंतर उड्डाणपुलाचे ‘विस्तार सांधे’ (एक्स्पान्शन जॉइंट) बदलण्याचे आणि डांबरीकरणासाठी शीव उड्डाणपूल वाहतुकीसाठी सलग २० दिवस बंद ठेवण्याचे नियोजन आहे.
बेअरिंग बदलण्याची प्रक्रिया
* पुलाचे वजन आणि वाहतुकीचा भार खांबावर थेट पडू नये, यासाठी खांब आणि गर्डरदरम्यान बेअरिंग बसवण्यात येतात. शीव उड्डाणपुलासाठी वापरलेले बेअरिंग हे गर्डर आणि खांब या दोहोंशी बोल्टने जोडलेले आहेत. ते काढण्यासाठी गर्डर आणि खांबाच्या पोकळीतील अत्यंत अरुंद जागेत कामगारास घुसावे लागते. शीव उड्डाणपुलाच्या बेअिरगचे बोल्ट जुने झाल्याने, ते काढण्यास प्रचंड वेळ लागत होता. त्यामुळे ते कापून काढायचा निर्णय घेण्यात आला.
* बोल्ट कापल्यामुळे गर्डर आणि खांब यांच्याशी बेअरिंग ची जोडणी करण्यासाठी नव्या बोल्टसाठी छिद्र करणे शक्य होणार नाही. त्यासाठी वेगळ्या तंत्राचा वापर करण्यात येत आहे. बेअरिंग च्या वर आणि खाली दोन्ही बाजूस स्टील प्लेट बसवण्यात आली आहे. वरच्या प्लेटला खाचा असून, तेथे केमिकल ग्राऊटिंग करून ती प्लेट गर्डरशी संलग्न केली जाईल, तर खालील प्लेटला खांबाशी बाहेरून जोड देण्यात येईल.
* जुने बेअरिंग काढून नवीन बसवण्यासाठी किमान पाच तास लागतात. हे नवीन बेअरिंग पुलाचा आणि वाहतुकीचा भार पेलतील.