मुंबईत स्वत:चे घर असावे असे प्रत्येकाचेच स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जण झटत असतो. भायखळा येथील राहत मंजील या इमारतीत आपले घर होणार यासाठी ७२ कुटुंबे आशा लावून होती. मात्र मुंबई महापालिकेबरोबर ५ वर्षांच्या संघर्षानंतर आता ही कुटुंबे बेघर झाली आहेत. ही इमारत बेकायदेशीर असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच सांगितले आणि याठिकाणी राहणाऱ्या लोकांना घरातून बाहेर काढले. ही इमारत बेकायदेशीर असल्याने ती पाडण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. मात्र न्यायालयाकडून आपल्यावर दया दाखविण्यात येईल आणि स्थानिक नेतेही आपल्या मदतीला येतील अशी या कुटुंबियांना आशा आहे.

या लोकांनी या इमारतीत दोन खोल्यांचे २६० स्क्वेअर फुटांचे घर तसेच तीन खोल्यांचे ३५० स्क्वेअर फुटांचे घर १५ ते ३५ लाखांच्या दरम्यान खरेदी केले होते. तळमजला धरुन ही इमारत ६ मजल्यांची असून सहा वर्षांपूर्वी हे व्यवहार झाले होते. साधारण वर्षभरात येथील रहीवाशांना मुंबई पालिकेची नोटीस आल्यानंतर आपली इमारत बेकायदेशीरपणे बांधण्यात आल्याचे समजले होते. भायखळा आणि माझगाव या भागात अशाप्रकारच्या अनेक इमारती असल्याचे समोर आले होते. याठिकाणचे स्थानिक या घरांना उपहासाने चायना बिल्डिंग म्हणतात. याचे कारणे म्हणजे याच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेला माल चायना मालाप्रमाणे कमी दर्जाचा आहे. ही इमारत ४ बांधकाम व्यावसायिकांनी एकत्र येत बांधली आहे. त्यांनी ही इमारत सुरक्षित असल्याचे आश्वासनही आपल्याला दिले होते असे येथील रहीवासी म्हणाले.

महापालिकेने केलेल्या कारवाईनंतर या ७२ कुटुंबांपैकी अनेक कुटुंबावर फूटपाथ आणि रेल्वे स्टेशनवर राहण्याची वेळ आली आहे. अनेकांनी या घरांसाठी लोन घेतलेले असल्याने त्यांना महिन्याला बँकेचे हप्तेही भरावे लागत आहेत. आम्ही आयुष्यभर कष्ट करुन जमवलेली पुंजी आम्ही या घरात घातली होती. मात्र एका रात्रीत होत्याचे नव्हते झाले. आमचे स्वप्न चुकीचे ठरले अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या. मुंबई पालिका उपायुक्त साहेबराव गायकवाड याबाबत बोलताना म्हणाले, तुम्हाला इतक्या कमी किंमतीत घर मिळते त्याचवेळी तुमच्या लक्षात यायला हवे की यामध्ये काहीतरी घोळ आहे. नागरिकांनी घर खरेदी करताना इमारतीची सगळी कागदपत्रे आणि रेरा रजिस्ट्रेशन यांची तपासणी वेळीच करायली हवी. नवीन बांधकाम व्यावसायिक नवीन बांधकामासाठी याठिकाणी येऊ नये म्हणून इमारतीचा मलबा काही दिवसांसाठी तसाच ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.