मुंबई : भाडे नाकारणाऱ्या, नियमबाह्य़ वर्तणूक असलेल्या ८५० मुजोर रिक्षा चालकांचे परवाने गेल्या पाच महिन्यांत परिवहन विभागाने रद्द केले आहेत. इतकेच नव्हे तर या रिक्षाचालकांना नव्याने परवाने मिळणार नाहीत, याची काळजी विभागातर्फे घेण्यात येणार आहे.

गेल्या पाच महिन्यांत चार हजार १३० चालकांचे परवाने आरटीओने ताब्यात घेतले. त्यापैकी ८५० जणांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. कुर्ला, वांद्रे, बोरिवली या भागात आरटीओने सर्वाधिक कारवाई केली आहे.

वांद्रे पूर्व येथील मुजोर रिक्षा चालकांविरोधात प्रवाशांच्या फेब्रुवारी, २०१९मध्ये तक्रारी आल्या होत्या. एका प्रकरणात चालकाने प्रवाशाला मारहाणही केल्याचे चित्रीकरण समाजमाध्यमांवर पसरले. त्यानंतर चोहोबाजूंनी आरटीओवर टीकेची झोडउ उठली. त्यानंतर आरटीओने २६ फेब्रुवारीपासून मुजोर रिक्षा चालकांविरोधात कारवाईच हाती घेतली. कुर्ला टर्मिनस, वांद्रे पूर्व व पश्चिम स्थानकाबाहेर कारवाईला सुरूवात केली. त्यानंतर घाटकोपर, मुलुंड, विमानतळ, बोरीवली स्थानकाबाहेरील रिक्षा चालकांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले. सकाळी ६ ते दुपारी २, सायंकाळी ४ ते रात्री १०, सकाळी ७ ते दुपारी १ या वेळांमध्ये ठिकठिकाणी कारवाई करण्यात आली. यात रिक्षा चालकांकडे बिल्ला, परवाना नसल्याची सर्वाधिक प्रकरणे आढळून आली. आरटीओतील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत १२ हजार १४५ प्रकरणांची नोंद आरटीओकडे झाली आहे. त्याविरोधात कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. यामध्ये बिल्ला, परवाना नसल्याची ६ हजार १२५ प्रकरणे उघडकीस आली. तर जादा प्रवासी नेल्याची ५ हजार ८२१ प्रकरणे नोंदवण्यात आली. जादा भाडे व भाडे नाकारल्याप्रकरणीही कारवाई झाली आहे. यात रिक्षाचालकांना दंड करण्याबरोबरच ४ हजार १३० रिक्षा चालकांचे परवाने जप्त करण्यात आले. तर २२५ रिक्षा ताब्यात घेण्यात आल्या.

* बिल्ला, परवाना नसणे – ६,१२५

* जादा प्रवासी नेणे – ५,८२१

* भाडे नाकारण्याच्या तक्रारी – ९१८

* जादा भाडे घेण्याच्या तक्रारी – ४२