भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी गुरूवारी पहाटे कडक पोलीस बंदोबस्तात मुंबईतील हाजी अली दर्ग्यात दाऊन दर्शन घेतले. पण हाजी अली दर्ग्यात सध्या विशिष्ट मर्यादेपर्यंतच महिलांना परवानगी आहे. त्याठिकाणापर्यंतच तृप्ती देसाई यांना आज प्रवेश देण्यात आला. देसाई यांच्यासोबत त्यांच्या महिला कार्यकर्त्या देखील होत्या.

दर्ग्यातील ‘मजार-ए-शरीफ’मध्ये महिलांना प्रवेश करण्यास मनाई आहे. मात्र, पुरूषांच्या बरोबरीने महिलांनाही त्याठिकाणी प्रवेश देण्यात यावा, अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे. पुढील पंधरा दिवसात महिलांना मजार प्रवेश देण्याचे आवाहन तृप्ती देसाई यांनी दर्ग्याच्या विश्वस्तांना केले आहे. तसे न झाल्यास आम्हाला आंदोलन आणखी तीव्र करावे लागेल, असेही त्या पुढे म्हणाल्या.

दरम्यान, दर्ग्यात जाऊन दर्शन घेतल्यानंतर देसाई यांनी हाजी अली पोलीस ठाण्यात देखील हजेरी लावली. दर्ग्यात जाऊन दर्शन घेणार असल्याची माहिती देसाई यांनी पोलिसांशिवाय इतर कोणालाच दिली नव्हती. पोलिसांनी देसाई यांना सहकार्य करत कडक बंदोबस्तात त्यांना प्रवेश मिळवून दिला. पोलिसांनी केलेल्या सहकार्याचेही देसाई यांनी आभार व्यक्त केले.

याआधी देखील देसाई यांनी आपल्या समर्थकांसह २८ एप्रिलला रोजी हाजी अली दर्ग्यात प्रवेशाचा प्रयत्न केला होता. मात्र, एमआयएम, समाजवादी पार्टीसह मुस्लीम नेते आणि संघटनांनी त्यास जोरदार विरोध केला होता. प्रवेशद्वारावरच मुस्लिम कार्यकर्ते ठाण मांडून बसले होते. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी देसाई यांना प्रवेश नाकारला होता. देसाई यांना त्यादिवशी दर्गाच्या प्रवेशद्वारावरूनच माघारी परतावे लागले होते.

IMG-20160512-WA0005