नरेंद्र मोदी यांना भाजपचे राष्ट्रीय निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्षपद दिल्यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी नाराज नव्हते. त्यांची नाराजी अन्य कारणांमुळे होती. ती दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी मंगळवारी केले. इंडियन एक्स्प्रेस आयोजित ‘एक्स्प्रेस अड्डा’ कार्यक्रमात बोलताना राजनाथ सिंह यांनी विविध क्षेत्रांतील मान्यवरांना मनमोकळेपणे उत्तरे दिली.
अडवाणी यांच्या नाराजीसंदर्भातील प्रश्नांवर राजनाथ सिंह म्हणाले, ‘अडवाणी हे ज्येष्ठ नेते आणि पितृतुल्य व्यक्तिमत्त्व आहेत. घरात मुलांनी कितीही अभ्यास केला, तरीही वडील त्यांना दटावतातच. त्याप्रमाणे अडवाणी यांनी आम्हाला दटावले.’ अडवाणी यांची नाराजी केवळ मोदी यांच्या नियुक्तीबाबत नव्हती. त्याला अन्यही काही कारणे होती, असेही सिंह यांनी सांगितले.
नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाचे उमेदवार घोषित करणार का, या प्रश्नावरही सिंह यांनी भाष्य केले. देशातील जनतेच्या भावनांची आम्हाला काळजी आहे. योग्य वेळी योग्य ते निर्णय अवश्य घेतले जातील, असे सांगत त्यांनी हा पंतप्रधानपदाच्या उमेदवाराचा प्रश्न टोलवून लावला.
सध्या कोणत्याही प्रादेशिक पक्षासह निवडणूकपूर्व युती करण्याचा विचार नाही. अशी युती करावी, अशी चर्चाही पक्षात नाही. काँग्रेस नेतत्वाखालील युपीएमध्येही निवडणुकीनंतर अन्य घटक पक्ष सामील झाले. मात्र निवडणुकीनंतर याबाबत विचार करावा लागणार नाही. कारण आता आम्हाला स्वबळावर सत्ता मिळेल, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 19, 2013 4:49 am