शहरी नक्षलवादाप्रकरणी अटकेत असलेले प्रा. आनंद तेलतुंबडे यांनी जामिनासाठी अर्ज केला असून त्यात त्यांनी आपण नेहमीच माओवादी विचारधारेचे टीकाकार राहिलो आहोत. आपण या विषयावर पुस्तकही लिहिले असल्याचा दावा केला आहे.

तेलतुंडबे यांच्यावर ते माओवादी विचारसरणीचे पुरस्कर्ते असून सीपीआय (माओवादी)चे सदस्य असल्याचा आरोप आहे. मात्र आपण सीपीआय (माओवादी)चे सदस्य असल्याचा कोणताही पुरावा तपास यंत्रणेने सादर केलेला नाही. उलट आपल्या ‘अ‍ॅन्टी इम्पिरियालिझम अ‍ॅण्ड अ‍ॅनहिलेशन ऑफ कास्ट्स’ या पुस्तकातून आपण माओवादी विचारधारेचे टीकाकार असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळेच आपल्याविरोधात लावलेला आरोप  खोटा असल्याचा दावाही तेलतुंबडे यांनी केला आहे. एल्गार परिषदेच्या दिवशी आपण मित्राच्या मुलाच्या लग्नासाठी पुण्यात होतो. त्यामुळे एल्गार परिषदेच्या सभेत आपण सहभागी झालोच नव्हतो, असा दावाही त्यांनी केला आहे.