बीआयटी चाळ, ‘लव्ह लेन’

बॉम्बे इम्प्रूव्हमेंट ट्रस्टने भायखळ्यात कष्टकऱ्यांच्या वस्तीच्या जागेवर तीन उमारती उभ्या केल्या. या इमारतींमध्ये १६० चौरस फुटांच्या तब्बल ८३० खोल्या बांधण्यात आल्या. या इमारतींमधील खोल्या मागासवर्गीयांना वास्तव्यासाठी देण्यात आल्या. यातलीच एक लव्ह लेनमधील बीआयटी चाळ.

trees in Mumbai being killed by poison
पूर्व द्रुतगती मार्गावरील ५० झाडांवर विषप्रयोग; पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
Sujay Vikhe Patil, terror-mongers,
दहशत माजविणाऱ्यांना चोख उत्तर द्या – डॉ. सुजय विखे पाटील
Mumbai new road
मुंबई : रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाच्या नवीन कामांसाठी १५ कंत्राटदारांचा प्रतिसाद

मुंबईच्या विकासासाठी राबणाऱ्या बहुजनांना वास्तव्यासाठी घर देण्यास कुणीही तयार नसल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील रामजी आंबेडकर यांनी मागासवर्गीयांना घरे मिळायलाच हवी असा आग्रह  ब्रिटिश सरकारकडे धरला. दरम्यानच्या काळात ब्रिटिश पार्लमेन्टमध्ये १८९८ साली बॉम्बे इम्प्रूव्हमेंट ट्रस्टची (बीआयटी) स्थापना करण्यात आली आणि या ट्रस्टने १९२४ मध्ये मुंबईत अनेक ठिकाणी दोन आणि तीन मजली इमारती बांधल्या. या इमारती बीआयटी चाळी म्हणून प्रसिद्ध आहेत. ब्रिटिश सरकारविरुद्ध भारतासह मुंबईत मोठय़ा प्रमाणावर उठाव होत होता. अनेकांची धरपकड करण्यात येत होती. ब्रिटिश पोलिसांनी मुंबईत ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना बॉम्बे इम्प्रूव्हमेंट ट्रस्टने बांधलेल्या इमारतींमधील छोटय़ा-छोटय़ा खोल्यांमध्ये डांबण्यात येत होते. एकूणच या इमारतींचा कारागृहासारखा वापर करण्यात येत होता असे आजही जुनीजाणती मंडळी आठवणींना उजाळा देताना सांगतात.

या बीआयटी चाळींपैकीच एक भायखळ्यातील लव्ह लेन. पूर्वी या ठिकाणी कष्टकऱ्यांची वस्ती होती. या वस्तीच्या आसपासचा परिसर वृक्षवल्लीने नटलेल्या होता. त्यामुळे या भागात ब्रिटिश अधिकारी कुटुंबासह फेरफटका मारण्यास येत. त्यामुळे या परिसराला लव्ह लेन नाव पडले असे या चाळीतील रहिवाशांचे म्हणणे आहे.

समाजाने नाकारलेल्या मागासवर्गीयांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आवाज उठवायला सुरुवात केली आणि अनेक चळवळी उभ्या राहिल्या. या चळवळींमध्ये लव्ह लेनमधील बी. टी. गायकवाड, संभाजी एलव्हे, व्ही. डी. उपळकर, आर. बी. फाले, ल. गो. पवार, के. एफ. मोरे, विश्राम जाधव (रामगडकर), दगडू साळवे (डिंभेकर), शांताराम शिंदे. प्रा. पी. व्ही. शेलार, भाऊराव फुलपगार, संभाजी वाघमारे आदी रहिवासी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विश्वासातील मंडळी म्हणून ओळखली जात. लव्ह लेनमध्ये समतावादी तरुण संघ, बौद्धजन पंचायत समिती (पूर्वीची महार ज्ञाती पंचायत समिती), बौद्धजन पंचायत समिती, भारतीय बौद्ध महासभा आदी संघटनांची मुहूर्तमेढ लव्ह लेनमध्ये रोवली गेली. जातिभेद, धर्मातर, नामांतर, कामगार, शेतकऱ्यांच्या चळवळी, धम्म दीक्षा आदींमध्ये लव्ह लेनमधील रहिवासी आघाडीवर होते.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मुंबईसारख्या शहरात स्पृश्य-अस्पृश्याची फारशी जाणीव होत नसली तरी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात दलित बांधवांवर अनन्वित अत्याचार होत होते. दलितांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध मुंबईमधील अनेक समाजबांधव पेटून उठले होते. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात १९६० च्या दशकात घडलेल्या घटनांचे तीव्र पडसाद मुंबईत उमटले. पुण्यातील बावडा प्रकरणाने दलित तरुणांचे पित्त खवळले. दलित समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी नामदेव ढसाळ यांच्यासारखी काही तरुण मंडळी एकत्र आली आणि त्यांनी १९७२ मध्ये लव्ह लेनमध्ये दलित पॅन्थरची स्थापना केली. दलित समाजातील साहित्यिक आणि विविध क्षेत्रांत नावारूपाला आलेली मंडळी दलित पॅन्थरमध्ये सक्रिय झाली. पॅन्थरच्या चळवळींना वेग आला आणि अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कार्यकर्ते ग्रामीण भागात सक्रिय होऊ लागले. मुंबईमध्ये ८, ९ आणि १० जानेवारी १९७४ रोजी जातीयवादाविरुद्ध आंदोलने सुरू झाली. भीमशक्तीचा नारा मुंबईत घुमू लागला. दलित पॅन्थरची पहिली सभा काही मंडळींनी उधळण्याचा प्रयत्न केला आणि दलित संघटनांविरुद्ध शिवसेना असा संघर्ष निर्माण झाला. त्यानंतर लव्ह लेनमध्ये नामदेव ढसाळांची सभा पार पडली. या सभेला मोठय़ा संख्येने दलित बांधव उपस्थित होते. दलितांवर होत असलेल्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठविण्यासाठी १० जानेवारी १९७४ रोजी खोदादाद सर्कल ते काळाघोडा दरम्यान मोर्चा काढण्याचे निश्चित करण्यात आले. लाखोंच्या संख्येने दलित बांधव मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चा परळ परिसरातील लक्ष्मी बिल्डिंगजवळ आला आणि अचानक मोर्चावर दगडफेक सुरू झाली. मोर्चेकऱ्यांची पळपळ सुरू झाली. या गोंधळात अडकलेल्या एका महिलेला वाचविण्यासाठी भागवत जाधव हा तरुण पुढे सरसावला आणि वर्मी दगड बसल्यामुळे भागवत जाधवला आपले प्राण गमवावे लागले. या घटनेमुळे मुंबईमध्ये भडका उडाला. भागवत जाधव लव्ह लेनमधील रहिवाशी. दलित चळवळींमध्ये सक्रिय असलेल्या वडिलांकडूनच भागवतला समाजसेवेचे बाळकडू मिळाले होते. या घटनेमुळे लव्ह लेनमध्ये शोककळा पसरली. ही सभा उधळण्यामागे शिवसैनिकांचा हात असल्याचा दलित बांधवांना दाट संशय होता. त्यामुळे दलित बांधव आणि शिवसेनेमध्ये प्रचंड वितुष्ट निर्माण झाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला ‘रिडल्स इन हिंदुइजम’ हा ग्रंथ सरकारने १९८७ मध्ये प्रकाशित केला आणि त्यावरून वादळ उठले. काही मंडळींनी या ग्रंथाच्या प्रतींची होळी केली. त्यामुळे पुन्हा एकदा संघर्षांला तोंड फुटले आणि लव्ह लेनमधील अनेक तरुणांनी चळवळीत उडी घेतली.

काही वर्षांपूर्वी लव्ह लेनमध्ये दारूचा गुत्ता चालविण्यात येत होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रभावित झालेले याच चाळीतील तरुण रहिवासी आणि भागवत जाधव यांचे बंधू सुमेध जाधव यांनी हा दारूचा गुत्ता बंद व्हावा यासाठी संघर्ष सुरू केला. चाळीतील समविचारी तरुणही या संघर्षांत सहभागी झाले. निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करीत या तरुणांनी अखेर दारूचा गुत्ता लव्ह लेनमधून हद्दपार केला. आज या गुत्त्याच्या जागेवर वाचनालय उभे आहे. ही चळवळही लव्ह लेनच्या इतिहासात अधोरेखित झाली आहे.

समाजवादी तरुण संघाने १९४४ मध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमास दस्तुरखुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर उपस्थित राहिले होते. वाढदिवसानिमित्त पार पडलेल्या या कार्यक्रमानंतर लव्ह लेनमधून डॉ. बाबासाहेबांची मिरवणूक काढण्यात आली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमाची आठवण आजही लव्ह लेनमधील कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. दलित चळवळीला बळ मिळावे यासाठी अनेक ज्येष्ठ नेते, शाहीर गदर यांसारख्या मान्यवरांनी लव्ह लेनमध्ये उपस्थिती लावली आहे. अनेक कलावंत, शाहीर लव्ह लेनने समाजाला दिले आहेत. लव्ह

लेनमधील उच्चशिक्षित मंडळी विविध पदांवर विराजमान झाली आहेत. आंबेडकरी विचारांचे बळ वसा घेतलेली लव्ह लेन दलित चळवळीचे केंद्र बनली आहे.

prasadraokar@gmail.com