आशिष शेलार यांचा राज ठाकरेंवर पलटवार

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन हा मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव असल्याची हाकाटी कालच एका नेत्याने केली आहे. विकासाच्या प्रत्येक कामावर या नेत्याची हीच प्रतिक्रिया असते. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन हे सर्व मुंबईला जगाशी जोडण्याचे प्रयत्न आहेत. भाजप हा प्रयत्न करतो, मग तुमच्या पोटात का दुखते, अशा शेलक्या शब्दांमध्ये राज ठाकरे यांचे नाव न घेता भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी पलटवार केला. लालबाग येथे झालेल्या छोटेखानी सभेत त्यांनी उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्यावरही अप्रत्यक्षपणे हल्ला चढवला.

‘ती सध्या काय करते’, अशी टॅगलाईन घेत शेलार यांनी शिवसेनेच्या सर्वच निर्णयांवर खरपूस टीका केली. ती सध्या काय करते, असे सांगत भाजपने आणलेल्या एलईडी दिव्यांच्या प्रस्तावाला विरोध, उन्नत रेल्वेमार्गाच्या प्रकल्पाला विरोध, भाजपच्या मेट्रो प्रकल्पांना विरोध, किनारा मार्गाला विरोध अशी जंत्रीच त्यांनी वाचून दाखवली. एकेकाळी युवासेनेच्या ज्या पदाधिकाऱ्यांच्या जीवावर मुंबईत फिरणारे युवा नेते आता त्याच पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करत आहेत. पण ‘नया हैं वह’ असे म्हणत त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावरही वाग्बाण सोडले.