राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी आज विधिमंडळात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या गौरव प्रस्तावरून जोरदार गदरोळ झाला. सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त राज्य सरकारनं त्यांच्या गौरवाचा दोन ओळींचा ठराव मांडावा, अशी मागणी भाजपाकडून करण्यात आली होती. मात्र, नियमांवर बोट ठेवत विधानसभा अध्यक्षांनी हा प्रस्ताव नाकारल्याने भाजपाकडून सरकारविरोधात जोरादार घोषणाबाजी करण्यात आली.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सत्ताधाऱ्यांनी सावरकरांचा गौरव प्रस्ताव मांडावा अशी मागणी लावून धरली होती. सावरकरांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून भाजपाकडून विधानसभेनं गौरव प्रस्ताव मंजूर करावा, अशी मागणी विधानसभा अध्यक्षांकडे करण्यता आली होती. आजच्या दिवसाचे कामकाज सुरू होताच भाजपा नेते सुधीर मुगंटीवार यांनी याबाबतची भाजपाची भूमिका मांडली होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्याला अनुमोदन दिले. तसेच, काँग्रेसचं मुखपत्र असलेल्या ‘शिदोरी’ मासिकावर बंदी आणण्याची देखील मागणी केली.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार विरोधकांना उत्तर देतांना म्हणाले, सावरकरांचं स्वातंत्र्य चळवळीतील योगदान कोणीही नाकारत नाही. मात्र, प्रत्येकाची मतं वेगळी असू शकतात. व्यक्ती तितकी मतं असतात. त्यांच्या देशकार्याबद्दल आम्हाला आदरच आहे. मात्र, सावरकरांच्या माध्यमातून भाजपाच्या नेत्यांना नेमका काय स्वार्थ साधायचा आहे हेच कळत नाही. तसेच, केंद्रात व राज्यात भाजपाचं सरकार असताना सावरकरांना ‘भारतरत्न’ का दिला गेला नाही, असा प्रश्नही त्यांनी यावेळी भाजपाला उद्देशून केला.

शिवसेना नेते अनिल परब यांनीही भाजपावर यावेळी टीका केली. सावरकरांना भारतरत्न द्या, तुमच्यासह पंतप्रधान मोदी यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव आम्ही स्वतः मांडू, असं ते विरोधकांना म्हणाले.