मुंबई : देशभरातील आयआयटीमध्ये मंगळवारपासून नोकरीसाठीच्या मुलाखतींचे पर्व (कॅम्पस प्लेसमेंट) सुरू झाले असून देश-विदेशातील नामांकित संस्था विद्यार्थ्यांना नोकरी देण्यास इच्छुक आहेत. कोटय़वधी रुपयांच्या वेतन प्रस्तावासह मेळावे सुरू झाले आहेत.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे मार्चमधील कॅम्पस मुलाखतींच्या पर्वावर काहिसा परिणाम झाला होता. अनेक विद्यार्थ्यांच्या हाती नोकरीचे प्रस्ताव असूनही प्रत्यक्षात त्यांना कंपन्यांनी रुजू करून घेतले नाही. मात्र, डिसेंबरमधील कॅम्पस मुलाखतींचे पर्व आशादायी वातावरणासह सुरू झाले आहे. नामांकित कंपन्या मेळाव्यांमध्ये सहभागी होत आहेत.

आयआयटी बॉम्बेमध्ये यंदा मुलाखतपूर्व प्रस्ताव स्वीकारणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. ‘ऑप्टिव्हर’ या कंपनीने १ कोटी ४० लाख रुपयांच्या वार्षिक वेतनाचा प्रस्ताव विद्यार्थ्यांला दिला आहे. पहिल्या दिवशीच्या पहिल्या सत्रात १८ कंपन्या सहभागी झाल्या असून त्यात मायक्रोसॉफ्ट, गुगल, टेक्सास इन्स्ट्रुमेंट्स, क्वालकॉम, बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप, अ‍ॅपल आदी कंपन्या सहभागी झाल्या होत्या. यंदा १५३ विद्यार्थ्यांनी मुलाखत पूर्व प्रस्ताव स्वीकारले आहेत. ‘क्वालकॉम’ या कंपनीने ४६.४१ लाखांचे, वर्ल्डक्वाण्ट कंपनीने ३९.७० लाख, मॉर्गन स्टेन्ली या कंपनीने ३७.२५ लाख तर उबरने ३५.३८ लाख इतके वार्षिक वेतनाचे प्रस्ताव आतापर्यंत दिले आहेत.

कोटय़वधींचे प्रस्ताव, आशादायी वातावरण 

’ आयआयटी मद्रासमध्ये पहिल्या दिवशीच्या पहिल्या सत्रात १२३ विद्यार्थ्यांना प्रस्ताव मिळाले. यामध्ये मायक्रोसॉफ्ट, बजाज ऑटो, इस्रो या कंपन्यांचा समावेश होता.

’ मायक्रोसॉफ्टने सर्वाधिक १९ तर इस्रोने १० विद्यार्थ्यांना प्रस्ताव दिले. आयआयटी मद्रासमध्ये यंदा सुमारे २५६ कंपन्यांनी नोंदणी केली असून यात ७१ नव्या कंपन्यांचा (स्टार्टअप्स) समावेश आहे.