संदीप आचार्य
मुंबई : दिल्ली, हरियाणा, गुजरात, राजस्थानसह महाराष्ट्रात करोनाचे रुग्ण पुन्हा वेगाने वाढू लागल्याने या राज्यात केंद्राची आरोग्य पथके पाठविण्यात येणार आहेत. त्याचबरोबर करोनाचे रुग्ण तातडीने शोधण्यासाठी करोना चाचण्यांचा वेग व प्रमाण वाढविण्याचे आदेश केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिले आहेत. मात्र करोना चाचण्या करताना बहुतेक राज्यांनी आरटीपीसीआर चाचण्यांऐवजी अँटिजेन चाचण्यांवर भर दिल्याने करोनाची खरी आकडेवारी मिळण्यात अडचण होते आहे.

महाराष्ट्रातही बहुतेक जिल्ह्यांमध्ये आरटीपीसीआर चाचण्यांऐवजी अँटिजेन चाचण्या करण्यात येत असून जवळपास निम्म्या जिल्ह्यात हे प्रमाण पन्नास टक्क्यांच्या आसपास आहे. अँटिजेन चाचण्यांच्या ठोस निकालाबाबत साशंकता असल्यामुळे अँटिजेन चाचणी निगेटिव्ह आली मात्र रुग्णात लक्षणे दिसत असल्यास तात्काळ आरटीपीसीआर चाचणी करण्याची मार्गदर्शकतत्वे आयसीएमआरने जाहीर केली आहेत. दुर्दैवाने महाराष्ट्रात दर लाख लोकांमागे जे चाचण्या करण्याचे प्रमाण निश्चित केले आहे तेवढ्या प्रमाणात चाचण्या केल्या जात नाहीत. राज्य कृती दलाने जवळपास आपल्या प्रत्येक अहवालात चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी आग्रह धरला आहे. मात्र मुंबईसह राज्यातील एकाही जिल्ह्यात त्याची काटेकोरपणे अमलबजावणी होत नसल्याचे टास्क फोर्सच्या एका वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले. महत्वाचे म्हणजे आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण वाढविणे आवश्यक असताना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या जिल्ह्यासह बहुतेक जिल्ह्यात अँटिजेन चाचण्यांवरच भर दिल्याचे दिसून येते.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एक कोटीहून अधिक चाचण्या राज्यात करण्यात आल्याचे  सांगितले. मात्र यात अँटिजेन चाचण्यांचे प्रमाण किती व आरटीपीसीआर चाचण्या किती केल्या हे सांगण्याचे सोयीस्करपणे टाळले. त्यातही ऑक्टोबर मध्ये झालेल्या रोजच्या चाचण्यांच्या तुलनेत नोव्हेंबर महिन्यात खूपच कमी चाचण्या झाल्यामुळेच रुग्णसंख्या कमी दिसल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. ३० ऑक्टोबर रोजी राज्यात ६८,८२८ चाचण्या करण्यात आल्या होत्या मात्र नोव्हेंबरमध्ये हे प्रमाण कमी होऊ लागले. ९ नोव्हेंबर रोजी ४१,७८६ चाचण्या करण्यात आल्या तर १५ ते १७ नोव्हेंबर या काळात अनुक्रमे २६,०४०,२३८३३ आणि २४,९६८ चाचण्या करण्यात आल्या. करोना वाढू लागल्याने १८ नोव्हेंबर रोजी ५२,५७३ चाचण्या करण्यात आल्या असून यात ५६४० नवे रुग्ण सापडले.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात चाचण्या होण्याची गरज असून यात आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण वाढविणे गरजेचे असल्याचे आरोग्य विभागाच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. मुंबईतही मधल्या काळात अँटिजेन चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले. १८ नोव्हेंबर रोजी मुंबईत २३.६३ अँटिजेन चाचण्या करण्यात आल्या तर याच दिवशी पुण्यात अँटिजेन चाचण्यांचे प्रमाण ३०.२६ टक्के, ठाणे ४६.४५ टक्के, नागपूर ४९.५८, आरोग्य मंत्र्यांच्या जालनात ४०.९०, परभणी ८०.२९, भंडारा ७७, सोलापूर ७३, वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या लातूरमध्ये ६२ , जळगाव ६१.६८ तर बीड, सांगली, वर्धा, अहमदनगर आदी जिल्ह्यात पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त चाचण्या या अँटिजेन चाचण्या करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने वाढते करोना रुग्ण व दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन चाचण्यांचा वेग वाढविण्याचा आदेश दिला असला तरी यात आरटीपीसीआर चाचणीचे प्रमाण काय असावे तेही स्पष्ट करावे असे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.