सिग्नल यंत्रणेतील बिघाड आणि रुळांच्या सांध्यातील बिघाड यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेची उपनगरी वाहतूक गुरुवारी विस्कळीत झाली होती. उपनगरी गाडय़ा विलंबाने धावत असल्या तरी एकही फेरी रद्द करण्यात आली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
सकाळी ८.२५ वाजता ठाणे आणि मुलुंड स्थानकाच्या दरम्यान एका सिग्नलमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाला. त्यामुळे धीम्या मार्गावरील दोन्ही दिशेची वाहतूक जलद मार्गावर वळविण्यात आली. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक सकाळी ऐन गर्दीच्या वेळी २० ते २५ मिनिटे विलंबाने सुरू होती.
सायंकाळी ६ च्या सुमारास पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानकाजवळ चर्चगेटकडे जाणाऱ्या जलद मार्गावरील रुळाच्या सांध्यामध्ये बिघाड झाला. त्यामुळे चर्चगेटकडे जाणारी जलद वाहतूक धीम्या मार्गावर वळविण्यात आली. या घटनेची सूचना प्रवाशांना देण्यात येत होती. गाडय़ा धीम्या मार्गावरून जात असल्याने २५ मिनिटे वाहतूक विलंबाने सुरू होती, असे पश्चिम रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.