अहवालात तत्कालिन अधिकाऱ्यांवर ठपका

मुंबई : ‘ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल’च्या (बार्क) तत्कालिन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी संगनमनताने ठरावीक वाहिन्यांना विशेषत: ‘रिपब्लिक’ वृत्त वाहिन्यांना फायदा व्हावा या उद्देशाने टीआरपी मोजमापाची पद्धतच बदलली, अशी माहिती हाती आल्याचा दावा गुन्हे शाखेने शुक्रवारी केला.

गुन्हे शाखेचे सहआयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, टीआरपीच्या (टेलिव्हीजन रेटींग पॉईंट्स) मोजमापाच्या विश्लेषणात लबाडी, हातचलाखी होत असल्याच्या तक्रारी ‘बार्क’कडे येऊ लागल्या. २०१९मध्ये उच्चपदस्थ अधिकाऱ्यांमध्ये खांदेपालट झाल्यानंतर ‘बार्क’ने त्रयस्थ संस्थेमार्फत देशभरातून हाती आलेला तपशील, त्याआधारे केलेल्या विश्लेषणांचे फॉरेन्सिक ऑडिट करून घेतले. त्याचा अहवाल जुलै महिन्यात ‘बार्क’ला मिळाला. तो अहवाल ‘बार्क’ने नुकताच गुन्हे शाखेकडे सुपूर्द केला. या अहवालात तत्कालिन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी केलेल्या लबाडीबाबत बरेच खुलासे आहेत, असा दावा भारंबे यांनी केला.

‘बार्क’मध्ये उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची टोळीच कार्यरत होती. त्यांनी संगनमताने २०१६ ते २०१९ या काळात ‘रिपब्लिक’सह अन्य वाहिन्यांना फायदा होईल यासाठी प्रत्येक टप्प्यावर लबाडी करत होती. तीन मार्गानी या टोळीने टीआरपीत फे रफार केले.  ‘रिपब्लिक’सह अन्य संशयित वाहिन्यांनी ग्राहकांना पैशांचे आमिष दाखवून आपापली वाहिनी सतत सुरू ठेवण्यास भाग पाडले. या कृ तीमुळे अचानक वाढलेला दर्शक कल पकडण्याची यंत्रणा ‘बार्क’कडे होती. असे संशयास्पद तपशील वगळणे आवश्यक असताना या अधिकाऱ्यांनी त्याआधारेच विश्लेषण करण्यास हाताखालील अधिकाऱ्यांना भाग पाडले, अशी माहिती तपासाशी संबंधित अधिकाऱ्याने दिली.

अधिकाऱ्यांची टोळी ‘रिपब्लिक’सह अन्य वाहिन्यांचा दर्शक कल वाढवून किंवा अन्य वाहिन्यांचा दर्शक कल गाळून विश्लेषण करत, सर्वाधिक टीआरपी असलेल्या इंग्रजी वृत्तवाहिनीला खाली खेचून ‘रिपब्लिक’सह अन्य वाहिन्यांना वरचढ ठरविण्याबाबत विविध माध्यमांतून साधलेल्या संवादांचीही नोंद फॉरेन्सिक ऑडिट अहवालात आहे. याअहवालातील निरीक्षणांआधारे तपास केला जाईल, असे भारंबे यांनी स्पष्ट केले.

गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने गुरुवारी ‘बार्क’चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पाथरे दास गुप्ता यांना पुणे येथून अटक केली. तर माजी मुख्य परिचलन अधिकारी (सीओओ) रोमील रामगडिया यांनी फॉरेन्सिक ऑडिट अहवाल येताच जुलै महिन्यात ‘बार्क’चे पद सोडले होते. ‘बार्क’च्या व्यवस्थापनात गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात बदल करण्यात आले. व्यवस्थापन बदलताच फॉरेन्सिक ऑडिट करून या आरोपांची शहानिशा करण्यात आली, अशी माहिती तपासाशी संबंधित अधिकाऱ्याने दिली.

लाचेबाबत तपास सुरू

‘रिपब्लिक’सह अन्य वाहिन्यांना फायदा व्हावा या उद्देशाने पदाचा, अधिकारांचा गैरवापर करणाऱ्या ‘बार्क’च्या तत्कालिन अधिकाऱ्यांना मिळालेल्या लाचेबाबत तपास सुरू आहे. त्याबाबत विचारणा केली असता, ‘विनाकारण किं वा फायदा नसल्यास कोणी अशी लबाडी का करेल’, अशी प्रतिक्रि या भारंबे यांनी दिली.