News Flash

पेट टॉक : सूर जमायला हवा..

सध्या अनेक सोसायटय़ांच्या मासिक बैठका पाळीव कुत्र्यांकडून इतरांना होणाऱ्या जाचावर गाजत आहेत.

श्वानपालनाची सुरुवातीची हौस फिटली की श्वानाकडे दुर्लक्ष करण्याकडे कल वाढतो. या प्रकाराचा धसका श्वान घेतात आणि त्यांच्यात आपसूक आक्रमकता शिरते. त्याचा त्रास परिसरातील इतरांना सहन करावा लागतो.

सध्या अनेक सोसायटय़ांच्या मासिक बैठका पाळीव कुत्र्यांकडून इतरांना होणाऱ्या जाचावर गाजत आहेत. काही ठिकाणी कुत्री पाळण्यास मनाई देखील करण्यात आली आहे. श्वानांमुळे चालणाऱ्या भांडणांच्या तक्रारी या पोलीस ठाण्यापर्यंत पोहचत आहेत. अलीकडेच  पुण्यातील हडपसर भागात पाळीव कुत्रे अंगावर गेल्याच्या क्षुल्लक बाबीचे पर्यवसान एका हत्येपर्यंत गेले. हत्येइतक्या टोकाच्या घटना विरळ असल्या तरी पाळीव कुत्र्यांमध्ये निर्माण होणारा आक्रमकपणा हा मुद्दा मानवी पालनदोषाचाच भाग आहे. म्हणूनच श्वानपालन करताना काही गोष्टी ध्यानात घ्यायला हव्याच.

नियमानुसार पाळीव कुत्र्यांची नोंदणी करणे आवश्यक असते. नोंदणीचे दरवर्षी नूतनीकरण करणे आणि त्यावेळी कुत्र्याचे लसीकरण झाले असल्याचे पशुवैद्यकाचे प्रमाणपत्र घेणेही गरजेचे असते. याकडे दुर्लक्ष करून श्वानपालनाची हौस पुरविल्यास त्याचा फटका नक्कीच बसतो.

भटक्या कुत्र्यांइतक्याच पाळलेल्या कुत्र्यांबाबतही अनेक तक्रारी येण्याचे मूलभूत कारण हे तो पाळताना न केलेला गृहपाठ हे आहे. या कुत्र्याच्या गळ्यात पट्टा तो कुत्रा पाळीव आणि पट्टा नसलेले कुत्रे भटके असे ढोबळ वर्गीकरण आपणच करून टाकले आहे. आपल्या पाळीव कुत्र्याच्या व्याख्येत बसणारी, गळ्यात पट्टा मिरवणारी ‘पाळीव’ कुत्री रस्त्यावर सर्रास मोकाट फिरताना आढळून येतात. त्यामध्ये हजारो रुपये खर्च करून अनेकदा हौशीने खरेदी केल्या जाणाऱ्या परदेशी प्रजातींचीही कुत्री असतात. त्यांना सुरुवातीला लाडाकोडात वाढविले जाते.

मग पालन झेपत नसल्याचे लक्षात आल्यावर रस्त्यावर सोडून दिले जाते. अचानक ‘अनाथ’ बनून रस्त्यावर बस्तान बसवावे लागल्यामुळे ही कुत्री आक्रमक झाल्याचेच समोर आले आहे. कुत्र्यांच्या स्थानिक प्रजातींपेक्षा हौसेने आणलेल्या परदेशी प्रजातींची रोग प्रतिकारशक्ती तुलनेने कमी असते. येथील वातावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता तुलनेने कमी असते. त्यात त्यांच्याकडे मालकांकडून दुर्लक्ष झाल्यास ती बिथरतात.

काय होते?

हौशीने आणलेले पिल्लू मोठे झाल्यावर अवाढव्य वाटू लागते आणि त्याला आपले घर पुरणार नाही याचा साक्षात्कार होतो. कुत्रा अचानकच मस्तीखोर वाटू लागतो.  कधीतरी घरी आणलेल्या कुत्र्याचा खर्च खूप असल्याची जाणिव होते. केस गळण्यासारखी समस्या थोडय़ाफार प्रमाणात सगळ्याच कुत्र्यांच्या बाबतीत असते त्याची जाणीव कुत्रे घरी आणण्यापूर्वी नसते. त्यातून या कुत्र्याकडे दुर्लक्ष होऊ लागते आणि मग आक्रमक झालेल्या कुत्र्याची रवानगी रस्त्यावर होते.

काय हवे?

कुत्रे किंवा कोणताही पाळीव प्राणी घरी आणण्यापूर्वी आपली गरज, घरातील परिस्थिती, आर्थिक परिस्थिती, जागा अशा अनेक गोष्टींचा विचार आवश्यक आहे. श्वानपालन हे किमान दहा-बारा वर्षांचे व्रत आहे हे लक्षात घ्यायला हवे. कुत्र्याला नुसतेच खाऊ-पिऊ घालण्यासोबत त्याला वेळही द्यावा लागतो, त्याच्याशी खेळावे लागते त्यामुळे वेळेचा हिशेब लक्षात घेणेही गरजेचे. कुत्रा पाळण्याचा निर्णय घेतल्यानंतर तो कोणत्या प्रजातीचा असावा याचाही विचार हवा.

सूर जमविण्यासाठी..

प्रत्येक प्रजातीनुसार कुत्र्याची स्वभाववैशिष्टय़े, सवयी, गरजा या वेगळ्या असतात. आपले कुटुंब, परिस्थिती आणि उत्साह लक्षात घेऊन कुत्र्याची प्रजाती निवडावी. घर छोटे असेल तर डॉबरमॅन, जर्मन शेफर्ड, सेंट बर्नार्ड, ग्रेट डेन असे मोठे कुत्रे कितीही आवडले तरी ते पाळणे अडचणीचे ठरू शकते. घराची एनर्जी लेव्हल हा दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पग, डाल्मेशियन यांसारखे कुत्रे खूप खेळकर असतात. त्यांचा मालक कमी उत्साही असेल तर ही कुत्री कधी कधी मस्तीखोर वाटू शकतात. थोडक्यात काय तर कुत्र्याची आणि आपल्या कुटुंबाचा सूर जुळणे हे महत्त्वाचे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2017 12:09 am

Web Title: common dog behavior issues
Next Stories
1 मुंबईत ‘सनबर्न’ला पोलिसांनी परवानगी नाकारली, कार्यक्रम रद्द
2 मंत्र्यांनो, गावागावांत प्रचारासाठी जा; उद्धव ठाकरेंचे आदेश
3 ‘खांदेरी’ पाणबुडीचे जलावतरण
Just Now!
X