News Flash

करोनाचा अधिवेशनाला फटका

चाचणी अहवालांच्या नियोजनाअभावी घोळ

(संग्रहित छायाचित्र)

आमदार प्रवेशासाठी ताटकळत; चाचणी अहवालांच्या नियोजनाअभावी घोळ

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी करोना चाचण्यांच्या अहवालाचा गोंधळ उडाला आणि त्याचा फटका आमदार, अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना सोमवारी बसला. आमदारांनाच प्रवेशद्वारासमोर ताटकळत उभे राहावे लागेल. शेवटी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हस्तक्षेप केल्यावर सर्व आमदारांना प्रवेश देण्यात आला. चाचण्यांच्या अहवालाचे योग्य नियोजन न झाल्यानेच हा सारा घोळ झाला.

करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळाच्या दोन दिवसीय अधिवेशनासाठी मोठय़ा प्रमाणात उपाययोजना करताना विधान भवनात प्रवेश करणाऱ्यांना करोना चाचणी बंधनकारक करण्यात आली होती. त्यांच्या अहवालानंतरच प्रवेश देण्याचा निर्णय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार विधान भवन परिसरात चाचणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. दोन दिवसांत सुमारे तीन हजार जणांची चाचणी करण्यात आली. साऱ्यांचे अहवाल वेळेत न आल्याने किंवा चाचणी झालेल्यांना त्याची माहिती नसल्याने सारा गोंधळ झाला.

सोमवारी कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी विधान भवनाच्या बाहेर प्रवेशासाठी रांगा लागल्या होत्या. कर्मचारी सकाळी लवकर दाखल झाले, पण त्यांचे अहवालच समजले नव्हते. चाचणी करताना संबंधितांचे नाव आणि संपर्क क्रमांक अर्जावर नोंदवून घेण्यात आले होते. यातून आमदार, कर्मचारी वा पोलीस कोण याचा उलगडा होत नव्हता. प्रवेशद्वारावर नाव व दूरध्वनी क्रमांक सांगितल्यावर खातरजमा करून करोना नसल्याबाबतचा अहवाल पाहूनच प्रवेश दिला जात होता. यात बराच वेळ गेला.

यानंतरच प्रवेशद्वारासमोर अडकलेल्या आमदारांना प्रवेश मिळाला. दोन तास ताटकळत राहूनही अहवालाबाबत काहीच माहिती दिली जात नसल्याने काही कर्मचाऱ्यांनी सरळ घरी जाणेच पसंत केले.

अंतर नियमाचे पालन करीत आमदारांची आसन व्यवस्था करण्यात आली होती. यामुळेच प्रेक्षक व अधिकाऱ्यांच्या गॅलऱ्यांमध्ये आमदारांची आसन व्यवस्था करण्यात आली. प्रत्येक बाकावर एरव्ही दोन सदस्य बसतात, पण या वेळी एका सदस्याला बसण्यास परवानगी होती.

आमदारांना आवाहन

विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांना करोनाची लागण झाल्यामुळे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या अध्यक्षतेखाली विधानसभेचे कामकाज पार पडले. करोनामुळे सभागृहाच एका बाकावर एकाच सदस्याला जागा देण्यात आली असून काही सदस्यांना प्रेक्षक गॅलरीत आसन व्यवस्था करण्यात आली होती. तसेच मंत्री, सदस्य आणि पत्रकारांशिवाय कोणालाच प्रवेश देण्यात आला नाही.

विधान भवनात दोन दिवस करण्यात आलेल्या करोना चाचण्यांमध्ये ६० जणांना करोना असल्याचे स्पष्ट झाले. यात पाच आमदारांचाही समावेश आहे. अधिकारी, कर्मचारी व पोलिसांचाही त्यात समावेश होता. याबाबत आमदारांना आधीच कळविण्यात आले. यामुळे ते विधान भवनात पोहचणार नाहीत याची खबरदारी घेण्यात आली होती.

माजी अध्यक्षांनाच रोखले

आमदारांचे अहवाल प्राप्त झालेले नसल्याने गोंधळ उडाला. अहवालाशिवाय आत सोडण्यास सुरक्षारक्षकांनी नकार दिला. विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे, कृषीमंत्री दादा भुसे यांच्यासह अनेक आमदार प्रवेशद्वारासमोर ताटकळत उभे होते. अहवालासाठी सरकारने एजंट ठेवलेत का, अशा शब्दांत  बागडे यांनी नाराजी व्यक्त केली. माजी अध्यक्षांना अशा प्रकारे प्रवेशद्वारासमोर उभे राहावे लागल्याने आमदारांनी नापसंती व्यक्त के ली. ही बाब समजताच उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रवेशद्वारासमोर पोहचले. त्यांनी आमदारांचे म्हणणे ऐकू न घेतले व अहवाल वेळेत का आले नाहीत, असे अधिकाऱ्यांनाच खडसावले. सर्व आमदारांना प्रवेश देण्याचा आदेश त्यांनी दिला.

आसनव्यवस्थेवर टिप्पणी

प्रत्येक आसनावर फुल्या मारण्यात आल्या होत्या. फुल्या असलेल्या आसनांवर सदस्यांनी बसू नये, असे स्पष्ट करण्यात आले होते. फुल्या बघून आमदारांमध्ये वेगळीच कुजबुज सुरू झाली. फुल्या मारलेले सदस्य पुढील वेळी बाद नाहीत ना, अशी शंका एका आमदाराने व्यक्त करताच लॉबीत हशा पिकला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2020 12:48 am

Web Title: confusion of corona test report on the first day of the rainy session abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 मुंबईत सलग पाचव्या दिवशी दीड हजाराहून अधिक रुग्ण 
2 परीक्षेची औपचारिकता
3 वैद्यकीय प्रवेशातील विभागानुसार आरक्षण रद्द
Just Now!
X