मुंबई : गुन्हे शाखेने शनिवारी अभिनेता हृतिक रोशन याचा जबाब नोंदवला असून हृतिकने चार वर्षांपूर्वी सायबर पोलिसांकडे नोंदवलेल्या तक्रारीबाबत तपासासाठी उपयुक्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.

आपले बनावट ई-मेल आयडी तयार करून अनोळखी व्यक्तीने अभिनेत्री कंगना राणावतसोबत संवाद साधल्याचा संशय हृतिकने २०१६ मध्ये लेखी तक्रारीद्वारे सायबर पोलिसांकडे व्यक्त केला होता. गेल्या महिन्यात या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता शाखेकडे (सीआययू) सोपवण्यात आला. सीआययूतील अधिकाऱ्यांनी समन्स जारी करत हृतिकला जबाब नोंदवण्यासाठी शनिवारी बोलावले होते. त्यानुसार हृतिक दुपारी १२च्या सुमारास गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजार झाला. अडीच तासांनी तो तेथून बाहेर पडला.

एका मुलाखतीत कंगनाने हृतिकचा उल्लेख ‘सीली एक्स’ असा केला. त्यावरून दोघांमध्ये वाद रंगला. कंगनाच्या ई-मेल आयडीवरून सुमारे दीड हजार ईमेल प्राप्त झाले. त्यापैकी एकाही ई-मेलला प्रतिसाद दिला नव्हता, असा दावाही हृतिकने या तक्रारीत केला होता. यातील ३५० ई-मेल सीआययूने तपासासाठी बाजूला काढले. त्याआधारे या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.