‘क्रिस्टल’ आगप्रकरणी विकासकाचा युक्तिवाद; २७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

आगीच्या घटनांपासून इमारतीचे संरक्षण करण्याची जबाबदारी ही त्यात राहणाऱ्या रहिवाशांची असल्याचा संतापजनक दावा परळ येथील ‘क्रिस्टल टॉवर’ला लागलेल्या आगीप्रकरणी अटकेत असलेला विकासक अब्दुल रझ्झाक इस्माईल सुपारीवाला याने गुरुवारी महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर केला. न्यायालयाने मात्र निवासी प्रमाणपत्र (ओसी) नसतानाही त्याने सदनिकांची विक्री कशी काय केली, याबाबत प्रश्न उपस्थित करत सुपारीवाला याला २७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

‘क्रिस्टल टॉवर’च्या १२व्या मजल्यावर आग लागल्याच्या घटनेनंतर काही तासांनीच पोलिसांनी निवासी प्रमाणपत्राशिवाय सदनिका विकण्याच्या आरोपाप्रकरणी सुपारीवाला याला अटक केली. गुरुवारी त्याला पोलीस कोठडीसाठी भोईवाडा महानगरदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. त्यावेळी सुपारीवाला याच्यावतीने या घटनेसाठी रहिवासीच जबाबदार असल्याचा दावा करण्यात आला. २०१२ पासून इमारतीतील रहिवाशांना सोसायटी स्थापन करण्यास सांगत होतो. परंतु त्यानंतरही त्यांनी सोसायटी स्थापन केली नाही. सोसायटी स्थापन करून अग्निसुरक्षेची व्यवस्था रहिवाशांनी करणे आवश्यक होते. मात्र रहिवाशांनी त्याकडे दुर्लक्ष केले, असा दावाही सुपारीवाला याने केला आणि आगीचे खापर रहिवाशांच्या डोक्यावर फोडण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे, तर २०१२मध्येच निवासी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पालिकेकडे अर्ज केला होता. परंतु पालिकेने अद्याप निवासी प्रमाणपत्र दिले नसल्याचा दावा करत सुपारीवाला याने पालिकेच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

तर निवासी प्रमाणपत्राशिवायच सुपारीवाला याने सदनिका विकल्याचा आरोप सरकारी वकिलांतर्फे करण्यात आला. या इमारतीत आग विझवण्याच्या दृष्टीने विकासकाने उपाययोजना केलेली नाही. शिवाय इमारतीच्या आठव्या मजल्यावर एक अनधिकृत बांधकाम असून दुसऱ्या एका बेकायदा बांधकामावर पालिकेने कारवाई केल्याची माहिती सरकारी वकिलांनी दिली. सुपारीवाला याची आणखी चौकशी करायची असल्याचे सांगत त्याला पोलीस कोठडी सुनावण्याची विनंती करण्यात आली. न्यायालयानेही सुपारीवालाने निवासी प्रमाणपत्राशिवाय सदनिका विकण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्याला पोलीस कोठडी सुनावली.