धनंजय मुंडे यांची बोचरी टीका; सेनेच्या मंत्र्यांना कमी निधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्याचा म्हणून युती सरकारने मांडलेला अर्थसंकल्प अर्थहीन तर आहेच, त्यात छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी एक रुपयाचीही तरतूद करण्यात आलेली नाही, पण भाजपच्या मंत्र्यांच्या खात्यांना ५५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, तर शिवसेनेच्या मंत्र्यांच्या खात्यांची केवळ दोन हजार कोटी रुपयांत बोळवण करण्यात आली, असे चिमटे काढत, शिवसेनेला अवमानीत करणारा हा अर्थसंकल्प आहे, अशी घणाघाती व बोचरी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.
राज्याच्या २०१६-१७ च्या अर्थसंकल्पावरील चर्चेला सुरुवात करताना मुंडे यांनी अनेक योजना व तरतुदींचा संदर्भ देत भाजप व शिवसेना या सत्ताधारी युतीत राजकीय फूट पाडण्याचा प्रयत्न केला. राज्यपालांच्या अभिभाषणात जाहीर केल्या जाणाऱ्या योजनांसाठी अर्थसंकल्पात तरतूद असणे अपेक्षित असते. परंतु राज्यपालांचे अभिभाषण एकीकडे, त्यावरील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण दुसरीकडे आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा अर्थसंकल्प तिसरीकडेच, अशी सरकारची दिशाहीन अवस्था आहे, असे मुंडे म्हणाले. राज्यपालांच्या अभिभाषणात शिवस्मारकाचा उल्लेख झाला परंतु, त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूदच नाही, परंतु अमरावतीमधील एका व्यायामशाळेसाठी निधी प्रस्तावित केला जातो, याकडे लक्ष वेधले.
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी एक रुपयाची तरतूद नाही, शिवआरोग्य योजनेसाठी तरतूद नाही, मी शिवसैनिक असतो, तर हा अर्थसंकल्पच मांडला नसता, सभागृहाच्या बाहेरच थांबलो असतो, असा चिमटा त्यांनी अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांना काढला.
राज्यात ३५०० शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यानंतर हे सरकार बळीराजाला अर्थसंकल्प समर्पित करते, शेतीमहोत्सव, शेतकरी स्वाभिमान वर्ष साजरे करण्याचे जाहीर करते, ही शेतकऱ्यांची चेष्टा आहे, असा हल्ला मुंडे यांनी चढविला. शेतकऱ्यांसाठी २५ हजार कोटी रुपयांची तद्दन फसवी घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. कृषीसलग्न सर्व योजनांची बेरीज केली तरी, १९ हजार कोटी रुपयांच्या वर रक्कम जात नाही, मग भरपाई करण्यासाठी सिंचनाचे ७ हजार कोटी रुपये त्यात टाकण्यात आले, अशी बनवाबनवी सरकारने केल्याचा आरोप त्यांनी केला. अर्थसंकल्पात भाजपच्या मंत्र्यांच्या खात्यांना ५५ हजार कोटी रुपये देण्यात आले. शिवसेनेच्या मंत्र्यांची मात्र दोन हजार कोटी रुपयांत बोळवण करण्यात आली आहे, तुम्ही सत्तेत कशासाठी राहिला आहात, असा सवाल मुंडे यांनी शिवसेनेच्या सदस्यांना केला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhananjay munde comments on budget session and slam on shivsena
First published on: 23-03-2016 at 03:08 IST