News Flash

आठवले यांचे घूमजाव ; शिवसेनेच्या हिंदूत्वामुळे सत्ता मिळणे अवघड

शिवसेनेची हिंदू त्वाची भूमिका माहीत असूनही आम्ही काही मुद्दय़ांवर त्यांच्याशी युती केली. याचा अर्थ त्यांचे हिंदूत्व आम्ही मान्य केले असा नाही, असे घूमजाव रिपब्लिकन पक्षाचे

| June 22, 2013 05:02 am

आठवले यांचे घूमजाव ; शिवसेनेच्या हिंदूत्वामुळे  सत्ता मिळणे अवघड

शिवसेनेची हिंदू त्वाची भूमिका माहीत असूनही आम्ही काही मुद्दय़ांवर त्यांच्याशी युती केली. याचा अर्थ त्यांचे हिंदूत्व आम्ही मान्य केले असा नाही, असे घूमजाव रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले आहे. त्याचबरोबर, शिवसेनेच्या कडव्या व प्रखर हिंदूत्वामुळे राज्याची सत्ता मिळणे अवघड आहे, अशी नवी भूमिकाही त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना मांडली. राज्याची सत्ता मिळवायची असेल तर, शिवसेनेने सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारी व्यापक भूमिका घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त बुधवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा हिंदुत्वाची गर्जना केली. गुरुवारी लोकसत्ताकडे प्रतिक्रिया व्यक्त करताना शिवसेनेच्या हिंदू त्वाबद्दल आरपीआयला काही आक्षेप नाही, असे आठवले यांनी म्हटले होते. त्यांचे हिंदूत्व मान्य करूनच आम्ही त्यांच्याशी युती केली होती, असे आठवले म्हणाले होते. मात्र त्यावर आरपीआयमध्येच खळबळ उडाल्यानंतर शुक्रवारी आठवले यांनी आपल्या विधानांची फिरवाफिरव केली. शिवसेनेचे हिंदूुत्व आम्हाला माहीत आहे. त्याला काही आक्षेप नाही, असे म्हटले होते, ते मान्य आहे, असे आपणास म्हणायचे नव्हते, असा खुलासा त्यांनी केला.
भाजपलाही केंद्रात हिंदुत्वाच्या अजेंडय़ावर सत्ता मिळविता आली नाही. १९९८ मध्ये इतर धर्मनिरपेक्ष विचारांच्या पक्षांना बरोबर घेतल्यामुळे एनडीएच्या रूपाने त्यांना सत्ता मिळाली, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
आम्ही आंबेडकरवादी आहोत हे मान्य करूनच शिवसेनाप्रमुखांनी शिवशक्ती-भीमशक्तीची कल्पना मांडली. आरक्षण प्रश्नावर दोन्ही पक्षांत मतभेद आहेत, असेही ते म्हणाले.
यापूर्वी आरपीआयच्या मदतीनेच काँग्रेस-राष्ट्रवादीने सत्ता मिळविली. त्यांना आमची गरज होती, तशीच सत्ता मिळविण्यासाठी शिवसेना-भाजपलाही आरपीआयची गरज आहे, याचा विसर पडू नये, याची आठवणही आठवले यांनी शिवसेना व भाजप नेतृत्वाला करून दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2013 5:02 am

Web Title: difficult to get state power from hindutva card ramdas athawale
टॅग : Ramdas Athawale
Next Stories
1 मुंबईत पुन्हा इमारत दुर्घटना; दहिसरमध्ये चार मजली इमारत कोसळली
2 नारी करी खरेदी गुगलवर सारी ?
3 एसटी कामगारांना १३ टक्के वेतनवाढ
Just Now!
X