सक्तवसुली महासंचालनालयाच्या कारवाईबद्दल संभ्रम

मुंबई : काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये चौकशी करण्याचा अधिकार सक्तवसुली महासंचालनालयाला असला, तरी विविध यंत्रणांनी केलेल्या तपासाच्या जोरावरच शक्यतो काळ्या पैशाचा मागोवा घेतला जातो. राज्य सहकारी बँक घोटाळाप्रकरणी तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागात दाखल झालेल्या तक्रारदाराच्या जबाबाचा महासंचालनालयाने वापर करून घेतला आहे. त्यामुळेच पवार यांच्या नावाचा त्यात उल्लेख आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

कुठल्याही घोटाळ्याप्रकरणात आर्थिक गुन्हे विभाग तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून तपास केल्यानंतर या जोरावर १०० कोटींपेक्षा अधिक रक्कम असल्यास महासंचालनालयाकडून गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली जाते. सुरुवातीला तपासात बाहेर आलेल्या मुद्दय़ांच्या आधारे माहिती घेतली जाते. त्यानंतर तक्रारीत नावे असलेल्या सर्वाना चौकशीसाठी समन्स काढून बोलाविले जाते.

या चौकशीदरम्यान नोंदविल्या गेलेल्या जबाबाचा संबंधित व्यक्तीविरुद्ध वापर करण्याचा अधिकारही काळा पैसा प्रतिबंधक कायद्यानुसार महासंचालनालयाला मिळाला आहे. या जोरावरच या यंत्रणेकडून पुढील तपास केला जातो. पवार यांचा या घोटाळ्याशी संबंध असल्याचे तक्रारदाराच्या जबाबात म्हटले असले तरी त्या दिशेने तपास करावा लागेल. त्यानंतरच गरज भासल्यास पवार यांना चौकशीसाठी बोलाविले जाईल, असे महासंचालनालयाशी संबंधित सूत्रांनी सांगितले.