|| संदीप आचार्य

गेल्या काही वर्षांत एकीकडे अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या जागा कमी होत आहेत, तर दुसरीकडे रिक्त जागांचे प्रमाणही दरवर्षी वाढत चालले आहे. यंदा अभियांत्रिकीच्या विविध शाखांमधील ६२ हजार जागा रिक्त राहिल्यामुळे महाविद्यालयाचा कारभार चालवायचा कसा, असा प्रश्न अनेक अभियांत्रिकी महाविद्यालयांपुढे निर्माण झाला आहे.

राज्यातील सुमारे साडेतीनशे अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये विविध शाखांमध्ये मिळून एकूण एक लाख २७ हजार जागा उपलब्ध होत्या. तथापि मेकॅनिकल व सिव्हिल या दोन्ही अभ्यासक्रमाच्या जागा मोठय़ा प्रमाणावर रिक्त राहिल्याचे दिसून येते. एकूण उपलब्ध असलेल्या जागांपैकी  ४८ टक्के म्हणजे ६२,०६८ जागा रिक्त राहिल्याचे तंत्रशिक्षण संचालनालयाच्या सूत्रांनी सांगितले.

राज्यात सिव्हिल इंजिनीअरिंगच्या एकूण २०,८३२ जागा असून त्यापैकी अवघ्या ६,८३० जागा भरल्या गेल्या. बहुतेक अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये या अभ्यासक्रमाच्या ४० ते ७० टक्के जागा रिक्त राहिल्या आहेत.

जी गत सिव्हिल इंजिनीअरिंगची तीच परिस्थिती मेकॅनिकल इंजिनीअरिंग अभ्यासक्रमाची झाली असून ३३,९०० जागांपैकी फक्त ९,५६६ जागा भरण्यात आल्या आहेत. इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंरगच्या एकूण ११,९४४ जागांपैकी ३,६९३ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. त्या तुलनेत कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या १७,४७६ जागांपैकी ११,६५४ जागा भरण्यात आल्या असून कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या ३२८ जागांपैकी २५६ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. गेल्या पाच वर्षांत अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता अडीच लाखावरून एक लाख २७ एवढी कमी झाली आहे. खरे तर ‘अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदे’ने महाविद्यालय व प्रवेश क्षमतेचा योग्य अभ्यास न करताच वारेमाप महाविद्यालय व अभ्यासक्रमांना परवानगी दिल्यामुळे ही कृत्रिम सूज आल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

त्यातच जवळपास पन्नास टक्के विद्यार्थ्यांची फी शासनाकडून भरण्यात येत असल्यामुळे अभियांत्रिकीच्या विविध शाखांमध्ये व विद्यार्थी संख्येमध्ये महाविद्यालयांनी भरमसाट वाढ केली. मात्र त्याच वेळी शैक्षणिक गुणवत्तेकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले होते. बहुतेक अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये आवश्यक ते अध्यापक नव्हते.

प्रयोगशाळांसह पायाभूत सुविधांची ओरड होती. परिणामी अभियांत्रिकीची पदवी हातात असलेल्या तरुणांना नोकऱ्या मात्र मिळत नव्हत्या. यातूनच अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या विविध शाखांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या रोडावू लागल्याचे व्हीजेटीआयचे निवृत्त प्राध्यापक सुरेश नाखरे यांनी सांगितले. गेल्या काही वर्षांत दर्जेदार शिक्षणाअभावी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला जाऊनही नोकऱ्या मिळणार नाहीत हे स्पष्ट झाल्यामुळेच अभियांत्रिकीच्या विविध अभ्यासक्रमांना जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वेगाने घसरू लागल्याचे तंत्रशिक्षण संचालनालयाच्या सूत्रांचे म्हणणे आहे.