आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) जगदीश लोहणकर यांनी गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (मनसे) प्रवेश केला. दरम्यान, कल्याणमधून ते निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असल्याचे कळते.

कल्याण येथे वरिष्ठ पोलीस निरिक्षक पदावर काम करीत असताना लोहणकर जनमानसांत दबंग अधिकारी म्हणून प्रसिद्ध होते. कल्याणमधील कोळसेवाडी पोलीस ठाण्यात ते कार्यरत होते.

मनसेचे वरिष्ठ पदाधिकारी काका मंडाले, उल्हास भोईर आणि कौस्तुभ देसाई यांच्या उपस्थितीत त्यांनी गुरुवारी रात्री पक्षात प्रवेश केला. कल्याण पूर्व मतदारसंघातून विधानसभेसाठी ते इच्छूक असल्याचे सुत्रांकडून कळते.

ठराविक भागात कारकीर्द गाजवणारे राज्यातील पोलीस अधिकारीही आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या आखाड्यात आपले वजन आजमावून पाहत आहेत. यापूर्वी स्वेच्छा निवृत्ती घेतलेले चकमकफेम प्रदीप शर्मा यांनी शिवसेनेत प्रवेश केला असून ते नालासोपाऱ्यातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. तर पुण्यातील निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे हे देखील शिवसेनेच्या वाटेवर असून पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.