गाळाचे समुद्रातच विसर्जन; पर्यावरणसंवर्धनाच्या योजनेलाच हरताळ

jitendra awad challenge to ajit pawar
“अजित पवारांच्या डोक्यातलं विष बाहेर आलं”, ‘द्रौपदी’वरच्या विधानावरुन जितेंद्र आव्हाडांची टीका
Rajnath singh
“मासे खा, डुक्कर, हत्ती खा नाहीतर घोडा खा, पण…?” तेजस्वी यादवांच्या व्हीडिओवर राजनाथ सिंहांचा टोला
Dombivli mangalsutra theft case
डोंबिवली मंगळसूत्र चोरी प्रकरण: इराणी टोळीतील १० आरोपींची ‘मोक्का’मधून मुक्तता
falgun purnima 2024
फाल्गुन पोर्णिमेला निर्माण होतेय दुर्मिळ युती! या ३ राशींच्या लोकांचे भाग्य सोन्यासारखे चमकेल! प्रगतीसह मिळेल बक्कळ पैसा

समुद्र, नदी, तलाव अशा नैसर्गिक जलस्रोतांमध्ये गणेशमूर्तीचे विसर्जन करून पर्यावरणास हानी पोहोचू नये यासाठी मुंबई महापालिका दरवर्षी दोन-अडीच कोटी खर्च करून कृत्रिम तलाव उपलब्ध करून देते. या तलावांत जेमतेम २० टक्के गणेशमूर्तीचे विसर्जन केले जात असतानाच या मूर्तीच्या गाळाचे विसर्जन अखेर समुद्रातच होत असल्याचे समोर आले आहे. भाविकांच्या भावनांना धक्का पोहोचू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला असला तरी, या योजनेमागील पर्यावरणसंवर्धनाचा हेतू मात्र मागे पडू लागला आहे.

शहरात दरवर्षी साधारण दोन लाखांहून अधिक घरगुती गणपती मूर्ती आणि सुमारे बारा हजार सार्वजनिक गणपती मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते. पालिकेने कृत्रिम तलाव उपलब्ध करून गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी सातत्याने जनजागृती केल्यावर आता २० टक्के मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावात होते तर ८० टक्के मूर्तीचे विसर्जन अजूनही समुद्र, नदी, तलाव अशा नैसर्गिक स्रोतांमध्ये केले जाते. पाण्याचे नैसर्गिक स्रोतांचे प्रदूषण थांबवण्यासाठी तसेच विसर्जन केलेल्या मूर्तीच्या गाळाच्या पुनर्वापरासाठी कृत्रिम तलाव हा उत्कृष्ट  पर्याय आहे. परंतु या तलावांमध्ये जमा होणाऱ्या गाळाचीही पर्यावरणपूरक पद्धतीने विल्हेवाट लावली जाणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात भाविकांच्या भावना दुखावतील म्हणून सरळधोप मार्ग स्वीकारून या गाळाचे पुन्हा समुद्रातच विसर्जन केले जाते, असे पर्यावरणतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

माजी महापौर डॉ. शुभा राऊळ यांनीही कृत्रिम तलावांच्या सद्य:स्थितीबाबत चिंता व्यक्त केली. कृत्रिम तलावात शाडूच्या मूर्तीचे विसर्जन करून त्यानंतर तो गाळ पुन्हा एकदा मूर्तिकारांकडे सोपवला पाहिजे. मात्र सध्या कृत्रिम तलावात शाडूसोबत ‘पीओपी’च्या मूर्तीचेही विसर्जन होते. पीओपीच्या मूर्ती विरघळत नसल्याने त्या अर्धवट मूर्तीची विल्हेवाट लावताना अडचणी येतात. तलावातील गाळ केवळ भरावासाठी वापरला जातो, असे राऊळ म्हणाल्या. कृत्रिम तलावातील गाळ समुद्रात टाकला जातो. याबाबत दोन वर्षांपूर्वी स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा झाली होती. मात्र नागरिकांच्या भावना दुखावतील, असे कारण पुढे करत पालिका अधिकारी हे मान्यच करत नाहीत, असे मनसेचे गटनेता संदीप देशपांडे यांनी सांगितले.

..म्हणून प्रयोग बंद केला

दहा वर्षांपूर्वी चेंबूरच्या पेस्तन सागर सोसायटीत कृत्रिम विहिरींचा प्रयोग सुरू करणाऱ्या डॉ. विजय संगोले यांनीही लोकांच्या प्रतिसादाला व गाळाची विल्हेवाट लावण्याच्या समस्येला कंटाळून दोन वर्षांपूर्वी कृत्रिम विहिरींची सेवा बंद केली. ‘पीओपीच्या मूर्ती पाण्यात विरघळत नसल्याने त्यांच्या विल्हेवाटीची समस्या असते. कृत्रिम तलावांमुळे लोकांना स्वच्छ, सुरक्षित वातावरणात विसर्जन करता येत असले तरी त्यामुळे पर्यावरणपूरक काही घडत नाही, त्यामुळे हा प्रयोग बंद केला,’ असे डॉ. संगोले म्हणाले.   .

पाच ते सात लाख खर्च

कृत्रिम तलावाच्या निर्मितीसाठी खोदावा लागणारा खड्डा, त्यातील प्लास्टिक कापड, दीड-पाच-सात दिवसांच्या विसर्जनानंतर बदलावे लागणारे पाणी, विसर्जन करण्यासाठी नेमलेली मुले, तलावातील गाळ घेऊन जाण्याचा वाहतूक खर्च तसेच सुरक्षारक्षक यासाठी किमान पाच ते सात लाख रुपये खर्च येतो. शहरात कृत्रिम तलावांची संख्या वाढत असून साधारण तीस कृत्रिम तलावांसाठी दोन कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.