राज्यातील शनिशिंगनापूर महालक्ष्मी आणि हाजी अलीच्या गाभाऱ्याची प्रवेशद्वारे महिलांसाठी खुली झाली असताना मुंबईतील एका गणेश मंडळाने महिलांच्या प्रवेशासाठी मर्यादा घातल्याचे समोर आले आहे. मुंबईतील लोकप्रिय अंधेरीच्या राजाच्या दर्शन घेण्यासाठी महिलांना जीन्स, स्कर्ट घालून येण्यास बंदी करण्यात आली आहे. या सार्वजनिक मंडळाने प्रवेशद्वाराजवळ फलक झळकावून मंदिरात प्रवेश बंदीच्या अटींची सूचना झळकवली आहे. महिलांनी जीन्स, स्कर्ट परिधान करून बाप्पाचं दर्शन घेण्यास येऊ नये, अशी सूचना फलकाद्वारे देण्यात आली आहे. त्यामुळे अधेंरीच्या  राजाच्या दर्शनास येणाऱ्या काही महिलांकडून याबाबत संताप व्यक्त केला जात आहे.

अंधेरीच्या राजाच्या मंडपाबाहेर जीन्स आणि स्कर्ट घालून येणाऱ्या महिला, मुलींना बंदीची सूचना देण्यासाठी लावण्यात आलेला फलक सध्या मुंबईत चर्चेचा विषय बनला आहे. सोशल मिडियातून या फलकाचा फोटोही व्हायरल झाला आहे. अनेकांनी तो शेअरही केलाय. यामुळे या मंडळावर टिका होत असून भक्तीचा आणि कपड्यांचा काय संबंध असा प्रश्नही उपस्थित करण्यात येत आहे.

पुरोगामी महादेराष्ट्रात समोर आलेली ही मर्यादा फक्त महिलांसाठीच मर्यादीत आहे असे नाही. पुरुषांना सुद्धा शार्टमध्ये बाप्पाचे दर्शन घेता येणार नाही. श्रद्धेपोटी अंधेरीच्या राजाच्या चरणी लीन होण्यासाठी ड्रेसकोडमुळे नवीन चर्चेला उधान आले आहे. मंडळ प्रशासनातील एका वरिष्टाने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, या नियम कोणालाही फारसा जाचक वाटणार नाही. श्रीचे दर्शन घेताना आपल्याकडे पारंपारिक वेशभूषा वापरण्याची पद्धती आहे. त्यामुळे नागरिक या फलकामध्ये दिलेल्या सूचनेचे पालन करतील, असे त्यांनी म्हटले आहे.