अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा जवळचा सहकारी एजाज लकडावाला याला मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने काल रात्री पाटणा विमानतळावरुन अटक केली. मुंबई पोलिसांच्या या कामगिरीचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कौतुक केले आहे. ही कामगिरी पार पाडणाऱ्या पोलिसांना योग्य बक्षीस दिले जाईल, असेही त्यांनी जाहीर केले. पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

देशमुख म्हणाले, “मुंबई पोलिसांनी अधिक चांगल्या प्रकारे काम करीत एजाज लकडावालाला अटक केली. पोलिसांची ही कामगिरी कौतुकास्पद आहे. लकडावाला सुरुवातीला दाऊदच्या गँगसाठी आणि छोटा राजनसाठी काम करीत होता. त्यानंतर छोटा राजन दाऊदच्या गँगपासून वेगळा झाल्यानतंर लकडावाला राजनसोबत काम करु लागला. लकडावालाविरोधात पोलिसांमध्ये मोक्कांतर्गत ४ गुन्ह्यांसह २५ खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. तसेच इतर ८० तक्रारीही त्याच्याविरोधात दाखल आहेत. अशा या मोठ्या गँगस्टरला पकडण्याचे काम मुंबई पोलिसांनी केले आहे.” पोलिसांच्या या कामगिरीबद्दल त्यांना पुरस्कार मिळणार का? या प्रश्नावर ते नक्कीच यासाठी पात्र आहेत, असे गृहमंत्री देशमुख म्हणाले.

“लकडावालाची मुलगी शिफा शेख हीला बनावट पासपोर्टच्या सहाय्याने देशाबाहेर जाताना मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली होती. त्यानंतर तिच्याकडे केलेल्या अधिक चौकशीनंतर एजाज लकडावालाची खबर आम्हाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी लकडावालाचा माग काढत त्याला बुधवारी रात्री पाटणा विमानतळावरुन अटक करण्यात आली. लकडावालाची कसून चौकशी करण्यात येत असून यामध्ये दोन लिंक मिळाल्या आहेत. त्यावरही सखोल चौकशी सुरु आहे,” असे देशमुख यांनी सांगितले.

आणखी वाचा – दाऊदचा हस्तक कुख्यात गँगस्टर एजाज लकडावाला अखेर अटकेत, मुंबई पोलिसांना मोठं यश

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी एजाज लकडावाला याला बुधवारी रात्री पाटणा विमानतळावरुन अटक करण्यात आली. अटक केल्यानंतर त्याला २१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत पाठवण्यात आलं आहे. एजाज लकडावाला मुंबई पोलिसांच्या वॉण्टेड यादीत होती. २००३ मध्ये बँकॉकमध्ये झालेल्या एका हल्ल्यात त्याचा मृत्यू झाल्याची अफवा पसरली होती.