करोना व्हायरसवर मात करण्यासाठी लस अखेर दृष्टीपथात आली आहे. आतापर्यंत जगभरात सहाकोटी पेक्षा जास्त नागरिकांना या व्हायरसची लागण झाली आहे. पंधरा लाखापेक्षा जास्त नागरिकांनी या व्हायरसमुळे आपले प्राण गमावले आहेत.

जानेवारीपर्यंत दोन आणि त्यानंतर एप्रिलपर्यंत चार लसी वापरासाठी उपलब्ध होतील, अशी सरकारला अपेक्षा आहे. अमेरिकन कंपनी फायझरने सुद्धा आपातकालीन वापरासाठी अर्ज केला आहे.

लसीचे तापमान मेन्टेन करण्यासाठी महापालिकेने ३०० कोल्ड स्टोअरेज बॉक्सेस आधीच संपादीत केले आहेत. लस वेळेत आणि वेगात पोहोचवण्यासाठी ट्रान्सपोटेशन सुविधेवर महापालिका काम करत आहे. लस स्टोअरेजची मध्यवर्ती व्यवस्था कांजूरमार्गमध्ये आहे. मुंबई मिररने हे वृत्त दिले आहे.

त्यानंतर अन्य रुग्णालयांमध्ये लसी स्टोअरेजी सुविधा करण्यात येईल. मुंबईला लसीचे डोस कसे पोहोचवणार? ते अजून स्पष्ट झालेले नाही. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट उत्पादन करत असलेल्या कोविशिल्ड लसीला मान्यता मिळाली, तर पुण्याहून येणाऱ्या प्रत्येक गाडीला पोलिसांचे सुरक्षाकवच असेल.

प्रत्येक शीतगृहाच्या बाहेर पोलीस बंदोबस्त असेल. सध्या जगभरात २६० लसी चाचणीच्या वेगवेगळया टप्प्यांवर आहेत. त्यात आठ लसींची भारतात निर्मिती होईल. त्यात तीन स्वदेशी लसी आहेत.