“हे सरकार शेतकऱ्यांबरोबर चर्चेच्या एकापाठोपाठ एक फेऱ्या घेऊन, एक प्रकारे विक्रम प्रस्थापित करत आहे. खरं म्हणजे चर्चेची जेव्हा पहिली फेरी सुरू झाली तेव्हाच शेतकऱ्यांचा प्रश्न निकाली लागला असता, तर मोदी सरकारची प्रतिष्ठा वाढली असती.” असं म्हणत शिवसेना नेते संजय राऊत यांनी शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

शेतकरी मोर्चात गोंधळ घालण्यासाठी ३०० पाकिस्तानी ट्विटर हॅण्डल्स; पोलिसांचा दावा

यावेळी संजय राऊत म्हणाले,  “हे आंदोलन देशभरात सुरू आहे. देशाच्या राजधानीत मागील ६० दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. संपूर्ण जग हे आंदोलन पाहत आहे. उद्या ट्रॅक्टर रॅली काढली जाणार आहे, हे पाहून मला असं वाटतं हे अभूतपूर्व आंदोलन उद्या होणार आहे. दिल्लीत जे लाखो शेतकरी जमा झालेले आहेत. ६० दिवसांपासून लढत आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी सर्व राज्यांमधील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. महाराष्ट्रभरातील शेतकरी मुंबईत पोहचत आहेत. काळजी घ्यावी लागेल, कारण मुंबई सारख्या शहरातून अजूनही करोना गेलेला नाही. नाहीतर पुन्हा नवीन संकट राज्यात निर्माण होईल, ही चिंता मुख्यमंत्र्यांना आहे.”

शेतकरी आज राजभवनावर

तसेच, “भविष्यात तुम्हाला शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवावाच लागणार  आहे. पण ६० दिवस शेतकऱ्यांना अशाप्रकारे तंगवून देशाच्या प्रजासत्ताक दिनी, शेतकऱ्यांचं आंदोलन राजधानी दिल्लीत सुरू ठेवून, तुम्हाला देशातील वातावरण बिघडवायचं आहे. अशांतता निर्माण करायची आहे, असं काही तुमचं कारस्थान आहे का? या शंका आता लोकांना येत आहेत.”  असं देखील संजय राऊत यांनी यावेळी बोलून दाखवलं.

भाजपामधील प्रमुख लोकांनाही वाटतं की प्रश्न सुटावा – 

“शेतकरी त्यांच्या मागण्यासाठी लढत आहेत. मैलो न मौल पायपीट करून ते दिल्ली किंवा मुंबईत पोहचले आहेत. याचा अर्थ असा आहे की, त्यांना भविष्याची चिंता सतावत आहे. अशावेळी सर्वच राजकीय पक्षांनी आपसातील मतभेद विसरून, एकत्र येणं गरजेचं आहे. भाजपामधील प्रमुख लोकांनाही वाटतं की प्रश्न सुटावा व ते आतल्या आत गुदमरलेले आहेत, त्यांना स्पष्टपणे बोलता येत नाही.”  असं देखील संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं.