मागच्या तीन दिवसांपासून मान्सूनच्या पावसाने विश्रांती घेतली आहे. पण या वीकएण्डला शनिवार, रविवारी मुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवलला आहे. मुंबई, पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस होईल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

मागच्या आठवडयात शनिवार पासून सुरु झालेल्या पावसाचा जोर मंगळवारपर्यंत कायम होता. त्यामुळे मुंबईची वाहतूक व्यवस्था कोलमडली होती. सखल भागात पाणी साचल्यामुळे ट्रॅफीक जाम होऊन रस्ते वाहतुकीचा वेग मंदावला तर रुळावर पाणी साचल्यामुळे मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली होती.

दादरच्या हिंदमाता परिसराला तळयाचे रुप आले होते. शनिवार ते मंगळवार या चार दिवसात सखल भागात अनेक वेळा पाणी साचले. बुधवारपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे मुंबई पूर्वपदावर आली आहे. पण आता शनिवार आणि रविवारी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.