मुंबई आणि परिसरात जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईसह सभोवतालच्या परिसरात ढगांची गर्दी झाल्याचे रडार व सॅटेलाइट इमेजेच्या माध्यमातून दिसत आहे. दक्षिण कोकणचा भागही ढगांनी व्यापला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई आणि परिसरात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, काही ठिकाणी दोन वाजेपर्यंत मागील सहा तासात ४० मिमीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे.

कोकण विभागातील बहुतांश भागात पुढील तीन ते चार दिवसांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्याच्या उर्वरित भागांत पाऊस ओसरणार असून, पुढील काही दिवस तो विश्रांती घेईल, असा देखील हवामान विभागाचा अंदाज आहे. सोमवारी (६ जुलै) विदर्भ आणि मराठवाडय़ातील तुरळक भागात जोरदार पाऊस पडला. गेल्या चोवीस तासांत मुंबई, ठाण्यासह कोकणात अनेक ठिकाणी मोठय़ा पावसाची नोंद झाली.

राज्यावर असलेला कमी दाबाचा पट्टा आणि अरबी समुद्रावरील हवेच्या चक्रीय स्थितीमुळे कोकण विभागांतील सर्वच भागांत आणि प्रामुख्याने मुंबई, ठाणे परिसरात अतिवृष्टी झाली. अनेक ठिकाणी चोवीस तासांत २०० ते ३०० मिलिमीटरपेक्षाही अधिक पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाने दिलासा दिला. या भागांत शेतीसाठी उपयुक्त पाऊस झाला आहे.

मुंबईकरांची तहान भागविणाऱ्या सात तलावांमध्ये गेले दोन दिवस पावसाने दमदार हजेरी लावली असून तलावातील पाणीसाठय़ात सुमारे ५१ हजार ६८५ दशलक्ष लिटर पाण्याची भर पडली आहे. पावसाने दडी मारल्याने जूनमध्ये खालावलेली जलपातळी वाढू लागली आहे.