मुंबई : ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’तर्फे दिला जाणारा मानाचा ‘जनस्थान पुरस्कार’ यंदा जेष्ठ कवी, कादंबरीकार आणि समीक्षक वसंत आबाजी डहाके यांना जाहीर झाला आहे. कुसुमाग्रजांच्या जयंतीच्या दिवशी २७ फेब्रुवारीला हा पुरस्कार डहाके यांना प्रदान केला जाणार आहे.

कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे १९९१ पासून जनस्थान हा द्वैवार्षिक पुरस्कार देण्यात येतो. यंदा पुरस्काराचे १५ वे वर्ष आहे. मागील २०१७ चा जनस्थान पुरस्कार विजया राज्याध्यक्ष यांना प्रदान करण्यात आला होता. १९९१ साली पहिला पुरस्कार हा विजय तेंडुलकर यांना प्राप्त झाला होता. त्यानंतर १९९३ साली विंदा करंदीकर, १९९५ साली इंदिरा संत, २०१३ साली भालचंद्र नेमाडे तर २०१५ साली अरुण साधू यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. मंगळवारी झालेल्या निवड समितीच्या बैठकीत बहुआयामी प्रतिभाशाली साहित्यकार वसंत आबाजी डहाके यांची एकमताने निवड करण्यात आली. साहित्यिक संजय जोशी, सदानंद बोरसे, मोनिका गजेंद्रगडकर, विलास खोले आणि रेखा इनामदार-साने, जयंत पवार यांचा निवड समितीत समावेश आहे. वसंत आबाजी डहाके यांचे ‘योगभ्रष्ट’, ‘शुभवर्तमान’, ‘शुन:शेप’, ‘वाचाभंगं’ हे प्रसिद्ध कवितासंग्रह आहेत. तसेच ‘अधोलोक’, ‘प्रतिबद्ध आणि मर्त्य’ या कादंबऱ्या, ‘यात्रा-अंतर्यात्रा’ व ‘माल टेकडीवरून’ हे लेखसंग्रह प्रकाशित झाले आहेत. याशिवाय त्यांचे ‘साहित्य आणि दृश्यकला’ हे समीक्षात्मक लेखन प्रसिद्ध आहे. मराठीतील कोशवाङ्मयातही त्यांनी मोलाची भर घातली आहे. ‘समकालीन वास्तवाचे भान जागृत असणाऱ्या या बहुआयामी प्रतिभाशाली साहित्यकाराचा सन्मान करण्याकरिता ही शिफारस केली जात आहे,’ असे निवड समितीने शिफारस करताना म्हटले आहे.

आपण काम करीत असतो आणि पुरस्कार अनपेक्षितपणे आपल्या कामाची पावती देऊन जातात. त्यामुळे काम करीत राहणे महत्त्वाचे आहे. मी नव्या पिढीतील लेखकांचे आवर्जून वाचतो. या पिढीबाबत मला आशा वाटते. मात्र, मराठी भाषा, शाळा आणि साहित्य टिकवण्याचे आव्हान मोठे आहे. मुलांना प्रयत्नपूर्वक वाचनाची गोडी लावायला हवी.

– वसंत आबाजी डहाके