नियोजनाचा अभाव; विस्कळीत वेळापत्रकाचा प्रवाशांना फटका

मुंबई : एसटीच्या आंतरजिल्हा प्रवासाला परवानगी मिळाली असली तरी नियोजनाच्या  अभावामुळे पहिला दिवस गोंधळाचा गेला. पुरेशा तयारीविना सेवा सुरु करण्याची घोषणा झाल्याने वेळापत्रक तयार करताना कर्मचारी, अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली.

कमी गाडय़ा, मनुष्यबळ, बंद संगणकीय आरक्षण, विस्कळीत वेळापत्रकाचा काही प्रमाणात प्रवाशांना फटका बसला.

करोनाची चाचणी बंधनकारक नसल्याचे स्पष्ट करुनही कोकण प्रवासासाठी २१ ऑगस्टपर्यंत चाचणी बंधनकारक असल्याचे प्रवाशांना काही आगार, बस स्थानकात सांगितले जात होते. त्यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रमही निर्माण झाला.

गेले काही दिवस गाडय़ा बंद असल्याने त्यांची तांत्रिक कामे पूर्ण होणे आवश्यक आहे. करोनाच्या धास्तीने मुंबई, ठाणे, पालघरमधील काही कर्मचारी अद्यापही गैरहजरच आहेत. परिणामी गाडय़ा आणि मनुष्यबळ पुरेसे नसल्याने काही विभागातून खूपच कमी गाडय़ा सुटल्याचे सूत्रांनी सांगितले. करोनामुळे लांब पल्ल्याच्या मार्गावरील एसटी सेवांनाही प्रवासी मिळण्यासाठी बराच काळ लागेल,  असे  मत एसटीतील अधिकारी व्यक्त करत आहेत. त्यात लांब पल्ल्याच्या गाडय़ांना चार ते पाच प्रवासी असल्यास गाडय़ा न सोडण्याच्या सूचना महामंडळाने आगारप्रमुखांना दिल्या आहेत.

१ हजार ९० फेऱ्या पूर्ण..

आंतरजिल्हा वाहतुकीअंतर्गत एसटीने गुरुवारी दुपारी ४ पर्यंत राज्यभरात ८४० बसेसद्वारे १ हजार ९० फे ऱ्या पूर्ण के ल्या होत्या. मुंबई, ठाण्यातून दिवसभरात ५ शिवनेरी बस पुण्याकडे रवाना झाल्या. त्यातून सुमारे १०० प्रवाशांनी प्रवास के ला. दादर येथून पुण्यासाठी पहिली शिवनेरी बस सकाळी ८ वाजता २० प्रवाशांना घेऊन रवाना झाली. उपलब्ध नसलेल्या गाडय़ा व प्रवासीही नसल्याने मुंबई, ठाण्यातून शिवनेरी गाडय़ा एक ते तीन तासांच्या अंतरानेच सोडण्यात आल्या. पुण्यातून मुंबईत के वळ एकच शिवनेरी दाखल झाली. त्यामध्ये १८ प्रवासी होते. मुंबईतील प्रमुख बस स्थानकातून सातारा, नाशिक, चिपळूण, अलिबाग, पुणे अशा मार्गावर फे ऱ्या सोडण्यात आल्या.