मल्लिकार्जुन खरगे यांचा हल्लाबोल

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा विषारी आहे, त्याविरोधात काँग्रेसची लढाई सुरू आहे, असा हल्लाबोल राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधताना केला. संघ विचाराचा पराभव करण्यासाठी सर्व धर्मनिरपेक्ष शक्तींना एकत्र करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे त्यांनी सांगितले. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी संघाच्या व्यासपीठावर जाणार की नाही, यावर सध्या चर्चा सुरू असतानाच, खरगे यांच्या संघावरील जहरी टीकेला महत्त्व प्राप्त झाले आहे.

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी खरगे यांच्या उपस्थितीत मंगळवारी प्रदेश काँग्रेसची आणि बुधवारी मुंबई काँग्रेसची बैठक झाली. पक्षाचे खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी, वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थित झालेल्या या बैठकांमध्ये आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि अन्य समविचारी पक्षांबरोबर आघाडी करण्याचा सकारात्मक सूर होता, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली.

बचेंगे तो..

लोकसभा निवडणुकीनंतर विरोधी पक्षांच्या आघाडीचा पंतप्रधान कोण असेल ते ठरेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. त्याकडे खरगे यांचे लक्ष वेधले असता, बकरी ईद मे बचेंगे तो मोहरम मे नाचेंगे, असा टोला त्यांनी हाणला.

मानवी हक्कांची गळचेपी

देशात वाढलेली महागाई, विशेषत पेट्रोल-डिझेलची दरवाढ, अल्पसंख्याक, दलितांवरील हल्ले, याबाबत लोकसभेत आवाज उठविला तरी, पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यावर काहीही भाष्य करीत नाहीत, अशी टीका खरगे यांनी केली. भाजप सरकारने आता मानवी अधिकारावरही घाला घालण्यास सुरुवात केली आहे. मानवी हक्कासाठी लढणाऱ्या बुद्धिजीवींना अटक करून, विवेकवादी विचारांच्या लोकांमध्ये दहशत निर्माण केली जात आहे. सनातनसारख्या संघटना धर्माच्या नावावर विचारवंतांचे खून करीत आहेत, कायदा हातात घेऊन ते फिरत आहेत, त्यांना शिक्षा करण्याऐवजी त्यांचे समर्थन केले जात आहे, असा आरोप त्यांनी केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विषारी विचार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी संघाचे विचार राबवीत आहेत. त्या विचारांच्या विरोधात काँग्रेसची लढाई सुरू आहे. कर्नाटकमध्ये त्यासाठीच आम्ही मुख्यमंत्रिपदाचा त्याग केला. आगामी निवडणुकीत सर्व धर्मनिरपेक्ष विचारांच्या पक्षांना एकत्र करून राजकीय लढाई लढली जाईल, असे त्यांनी सांगितले.

राहुल गांधी संघाच्या व्यासपीठावर जाणार का?

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने भाषणासाठी राहुल गांधी यांना निमंत्रण दिले आहे, अशी चर्चा आहे. राहुल संघाच्या व्यासपीठावर जाणार का, असे विचारले असता, काँग्रेसची लढाई संघाच्या विरोधात असताना त्यांच्या मुख्यालयात राहुल गांधी जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे खरगे म्हणाले. परंतु लगेच मला विचारले तर, त्यांनी संघाच्या कार्यक्रमाला जाऊ नये, असे आपण त्यांना सांगू अशी सारवासारव केली.