मंजुळा शेट्ये मृत्यूप्रकरणातील तीन आरोपींना मंगळवारी जिल्हा सत्र न्यायालयाने हादरा दिला. बिंदू नाईकोडी, वसिमा शेख आणि सुरेखा गुळवेचा जामीनअर्ज न्यायालयाने फेटाळून लावला.

मंजुळा शेट्येला २३ जून २०१७ रोजी भायखळा कारागृहातील महिला कारागृह रक्षकांनी मारहाण केली होती. या मारहाणीत मंजुळा शेट्येचा मृत्यू झाला होता. तुरुंगातील अन्य महिला कैद्यांनी दिलेल्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी जेलर मनीषा पोखरकरसह सहा जणींना अटक केली होती. तुरुंगात असलेल्या सहा आरोपींनी जामिनासाठी गेल्या आठवड्यात अर्ज केला होता. यातील जेलर आणि अन्य दोन जणांनी जामीन अर्ज मागे घेतला. तर उर्वरित तिघांच्या जामिनावर गेल्या आठवड्यात युक्तिवाद झाला होता. सरकारी वकिलांनी त्यांना जामीन देण्यास विरोध दर्शवला होता.  बिंदू, वसिमा आणि सुरेखा या तिघांच्या अर्जावर मंगळवारी न्यायालयाने निर्णय दिला. न्यायालयाने तिघींचा जामीन अर्ज फेटाळला.

दरम्यान, मंजुळा शेट्ये प्रकरणात सप्टेंबर महिन्यात आरोपपत्र झाले होते. यात शारीरिक अत्याचाराचा उल्लेख नव्हता. आरोपींविरोधात हत्या, पुरावा नष्ट करणे असे कलम लावण्यात आले होते.  मंजुळा शेट्येच्या मृत्यूनंतर राज्य महिला आयोगाने निवृत्त न्यायमूर्तीच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक नेमले होते. या पथकाने नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अहवाल दिला होता. यात विविध कारागृहांत शिक्षा भोगत असलेल्या महिला कैद्यांना शासकीय खर्चाने शिकाकाई वा साबण, शॅम्पू, बांगडय़ा, कुंकू-टिकली, सॅनिटरी पॅड, पुरेसा आहार अशा मूलभूत सोयी-सुविधांबरोबरच, वर्तमानपत्र, रेडिओ आणि धूम्रपानासाठी स्वतंत्र ‘स्मोकिंग झोन’ (धूम्रपान कक्ष) निर्माण करावा, अशा शिफारसी केल्या होत्या.