‘ओम शांती ओम’ या चित्रपटात केलेल्या आपल्या अभिनयाच्या नक्कलीवरून तब्बल सहा वर्षांनी प्रसिद्ध अभिनेते मनोज कुमार यांनी ‘किंग खान’ शाहरूख याच्यासह चित्रपटाची दिग्दर्शक फराह खान यांना न्यायालयात खेचले आहे. मनोज कुमार यांनी मंगळवारी अंधेरी महानगरदंडाधिकाऱ्यांकडे या दोघांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल केला.
‘ओम शांती ओम’मध्ये शाहरूखने आपल्या अभिनयाची नक्कल करून आपली प्रतिमेला धक्का पोहचविला असल्याचा आरोप मनोज कुमार यांनी केला आहे. दोघांनीही चित्रपटातील नक्कलीचा ‘तो’ शॉट वगळण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतरही चित्रपटात ‘तो’ शॉट दाखविण्यात आला. त्यामुळे त्यांनी आपली फसवणूक केल्याचेही कुमार यांनी तक्रारीत म्हटले आहे.
यापूर्वीही म्हणजेच चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही महिन्यांनीच २००८ मध्ये मनोज कुमार यांनी दोघांविरुद्ध याच कारणासाठी मानहानीचा दावा ठोकला होता. मात्र शाहरूखने व्यक्तिश: माफी मागितल्यानंतर तसेच नक्कलीचा ‘तो’ शॉट चित्रपटातून काढून टाकण्याचे आश्वासन दिल्यानंतर कुमार यांनी दावा मागे घेतला होता.  
मात्र त्यानंतरही ‘त्या’ शॉटसह चित्रपट जपान येथील महोत्सवात दाखविण्यात आला. या प्रकाराने संतापलेल्या कुमार यांनी मंगळवारी न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने चित्रपटाची फित सादर करण्याचे आदेश दिले आहेत.