उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ आढळून आलेल्या स्कॉर्पियो गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यानं राज्यात खळबळ उडाली आहे. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून, या प्रकरणात विरोधकांकडून एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे यांचंही नाव घेतलं जात आहे. यावरून विधानसभेत खडाजंगी पाहायला मिळाली. विरोधकांकडून ठाकरे सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली जात असतानाच वाझे यांचं नाव घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं सरकारला सवाल केला आहे.

स्कॉर्पियो गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह काल (५ मार्च) मुब्रा रेतीबंदर येथे आढळून आला. या घटनेनंतर अंबानींच्या घराजवळ आढळून आलेल्या स्फोटकं प्रकरणाला नाट्यमय वळण मिळालं आहे. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त केला जात असून, या प्रकरणात सचिन वाझे यांचं नाव घेतलं जात आहे.

आणखी वाचा- मनसुख हिरेन कोण होते?, ती कार त्यांच्याकडे कशी आली?

सचिन वाझे यांच्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं शंका उपस्थित केल्या आहेत. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करून सरकारला सवाल केले आहेत. “सचिन वाझे यांनी २००८ साली शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे या प्रकरणाचं गूढ अधिकच वाढले आहे. सगळ्या महत्त्वाच्या केसेस या त्यांच्याकडेच का सोपवल्या जातात? तसेच शिवसेनेचे मुख्यमंत्री झाल्यावर सचिन वाझे पुन्हा शासकीय सेवेत कसे रुजू होतात?,” असे सवाल देशपांडे यांनी उपस्थित केले आहेत.

आणखी वाचा- अंबानी प्रकरण: फडणवीसांच्या गंभीर आरोपांवर सचिन वाझे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

आणखी वाचा- मनसुख हिरेन यांच्या मृत्यूवर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

गुरूवारी रात्री बेपत्ता… शुक्रवारी सापडला मृतदेह

ठाण्यातील  डॉ. आंबेडकर मार्गाजवळील विकास पाम इमारतीमध्ये मनसुख हिरेन हे कुटुंबासमवेत राहत होते. त्यांचे वंदना सिनेमा परिसरात कार सजावटीचे दुकान आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेले वाहन गेल्या आठवडय़ात सापडले. मुंबई पोलिसांच्या तपासात हे वाहन मनसुख यांचे असल्याचे समोर आले. तेव्हापासून त्यांची याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू होती. असे असताना गुरुवारी रात्री ते बेपत्ता झाले. शुक्रवारी सकाळी त्यांचा मृतदेह मुंब्रा खाडीत आढळून आला.

आणखी वाचा- “क्रॉफर्ड मार्केटमध्ये भेट झालेली ‘ती’ व्यक्ती कोण?,” अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकं प्रकरणी फडणवीसांचे गंभीर आरोप

नेमके काय घडले?

एक दूरध्वनी आल्यानंतर मनसुख हिरेन घोडबंदर येथे जात असल्याचे आपल्या कुटुंबीयांना सांगून गुरुवारी रात्री घराबाहेर पडले. ते घरी परतलेच नाही. शुक्रवार दुपापर्यंत त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तो होत नसल्यामुळे हिरेन कुटुंबीयांनी नौपाडा पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. तक्रारीतील वर्णनाशी मुंब्रा खाडीत शुक्रवारी सकाळी सापडलेल्या मृतदेहाचे वर्णन जुळत असल्याने पोलिसांकडूून ही बाब समोर आली.