९ दिवसांत ३००हून अधिक फेऱ्या रद्द; ९० जणांचा रेल्वे अपघातात मृत्यू

प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या विविध सोई-सुविधांचा लेखाजोखा घेण्यासाठी रेल्वेने नुकत्याच राबविलेल्या ‘हमसफर’ या विशेष सप्ताहातच प्रवाशांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागला आहे. गेल्या अवघ्या नऊ दिवसांत विविध कारणांमुळे तब्बल ३००हून अधिक सेवा रेल्वेला रद्द कराव्या लागल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागले. त्यातही गंभीर म्हणजे याच काळात तब्बल ९० प्रवाशांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

मोदी सरकारच्या कार्यकाळास दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्याबद्दल रेल्वे मंत्रालयातर्फे रेल्वे ‘हमसफर’ सप्ताह २४ मे पासून सुरू झाला. यासाठी प्रत्येक दिवसाची स्वच्छता, सतर्कता, सामंजस्य, संयोजन आणि संचार अशात विभागणी करण्यात आली. मात्र याच काळात उपनगरीय रेल्वे मार्गावर अधिक गोंधळ झाल्याने प्रवाशांची अधिक गैरसोय झाल्याचे पाहायला मिळत आहे. यात तांत्रिक बिघाडांसह रेल्वे रुळालगत गोळा करून ठेवलेल्या कचऱ्याला आग लागल्याने, सिग्नलमध्ये बिघाड झाल्याने सेवा रद्द झाल्या आहेत. यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले.

यात बुलेट ट्रेनचे वायदे सुरू असताना छोटय़ा तांत्रिक बिघाडाचे काम रेल्वेकडून नीट होत नसल्याने प्रवाशांकडून टीका केली जात आहे. तर इतक्या वेळा मेगाब्लॉक घेऊनही तांत्रिक बिघाड होतातच कसे, मुंबईवर राज्य करू पाहणाऱ्या राजकीय नेत्यांचे याकडे लक्ष का जात नाही असे प्रश्न प्रवासी उपस्थित करत आहेत.
train1

प्रभूंचे एक ट्वीटही नाही!

हमसफर सप्ताह काळात इतके गोंधळ होत असताना रेल्वेमंत्र्यांनी मात्र याकडे दुर्लक्ष केले असा आरोप प्रवासी करत आहेत. एरवी समाजमाध्यमावर सक्रिय असणाऱ्या रेल्वेमंत्र्यांनी मुंबईकरांच्या समस्यांकडे आपले लक्ष आहे  यासाठी साधे एक ट्वीटदेखील केले नसल्याचा आरोप केला जात आहे.