महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातून मला लाखो राख्या पाठवण्यात आल्या. मला इतक्या सगळ्या बहिणींनी भाऊ मानलं, फक्त राखीच नाही तर तुमचे विचार, सल्ले पत्राद्वारे कळवलेत याबद्दल मी तुमचा ऋणी आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मला राखी पाठवणाऱ्या २५००००० बहिणींचे मी आभार मानतो. एखाद्या मुख्यमंत्र्याला एवढ्या मोठ्या प्रमाणावर राख्या पाठवण्याचा हा जागतिक विक्रमच आहे. हा विक्रमही मी तुम्हा सगळ्यांच्या नावे करतो असेही त्यांनी म्हटले आहे.

तुम्ही भाऊ म्हणून माझ्यावर जो विश्वास दाखवलात त्यामुळे मी भारावून गेलो आहे. एक काळ असा होता की बहीण भावाला राखी तिच्या रक्षणासाठी बांधायची. आता काळ बदलला आहे. आता बहिण भावाच्या हाती राखी बांधते आणि भावाचं आयुष्य समृद्ध करण्याची उर्जा त्याला देते. ही बहिणीची ताकद आहे. कारण आजच्या काळातली स्त्री, बहिण, मुलगी या सगळ्याजणी सक्षम आहेत. त्या एक सकारात्मक उर्जा पसरवण्याचं काम करत आहेत ही निश्चितच अभिमानाची बाब आहे असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. नारी शक्ती सन्मान महोत्सवाचं आयोजन भाजपातर्फे करण्यात आलं होतं. त्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी त्यांचे विचार मांडले. या कार्यक्रमाला चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे या सगळ्यांचीही उपस्थिती होती.

गेल्या काही वर्षांमध्ये विकासाला गती देणारी स्त्रीदेखील आहे हे आपल्याला विसरुन चालणार नाही. काही वर्षांपूर्वी स्त्रीला कमी लेखलं जायचं आज मात्र ती परिस्थिती नाही. आपल्या बहिणी आपल्या पाठिशी आहेत अनेक कठीण प्रसंगाना त्यादेखील तोंड देत आहेत. समाजाच्या जडणघडणीचंही काम करत आहेत ही बाब कौतुकास्पद आहे असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. जनसंघाच्या काळात आम्ही अनेक स्त्रियांना लढताना, आंदोलन करताना पाहिलं आहे. भाजपा महिला मोर्चाचा इतिहासही खूप मोठा आहे तसेच नारीशक्तीचा गौरवशाली इतिहास आपल्या देशात आहे. नारीशक्तीला आणखी बळ मिळावं यासाठी आपण जनजागृती केली पाहिजे असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.