राज्य प्रवेश परीक्षा कक्षाने घेतलेल्या अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमाच्या सामायिक प्रवेश परीक्षेत (सीईटी) एकूण २३ प्रश्न चुकीचे असल्याचे कक्षाने स्पष्ट केले असून ज्या सत्रातील प्रश्न चुकले असतील त्या सत्रातील विद्यार्थ्यांना त्याचे गुण मिळणार आहेत.

ऑक्टोबरमध्ये सीईटी घेण्यात आली. एकूण ३२ सत्रांमध्ये ही परीक्षा झाली. राज्यातील ३ लाख ८३ हजार ७३६ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात परीक्षा दिली. परीक्षेसाठीच्या एकूण ३२ प्रश्नपत्रिकांमध्ये मिळून २३ प्रश्न किंवा त्यांचे पर्याय यात चूक असल्याचे कक्षाने स्पष्ट केले आहे. ज्या सत्रात चुकीचे प्रश्न असतील त्या सत्रातील विद्यार्थ्यांना गुण देण्यात येणार आहेत. प्रश्न सोडवणाऱ्या किंवा सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना हे गुण मिळतील. यानुसार काही सत्रांतील विद्यार्थ्यांना १ ते ४ गुण मिळतील.

परीक्षेची उत्तरसूची जाहीर करून कक्षाने त्यावर हरकती मागवल्या होत्या. त्यानुसार ७९१ हरकती विद्यार्थी, पालकांनी नोंदवल्या. त्यातील ६५ हरकतींमध्ये तथ्य असल्याचे समोर आले असून २३ प्रश्नांबाबत या हरकती होत्या.