लाखो शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळाच्या कामात लाखोंचा घोटाळा झाल्याची बाब सकृतदर्शनी उजेडात आली आहे. ज्या ‘निसर्ग उद्यान’ सस्थेला उद्यान विकसित करण्याचे काम देण्यात आले त्यांनी पालिकेला दिलेल्या बिलामध्ये झाडांसाठी लावलेल्या किमतीतच चार लाख रुपये जादा उकळल्याचे  आढळून आले आहे. स्थायी समिती अध्यक्ष तसेच दक्षिण मध्य मुंबईतील शिवसेनेचे लोकसभेचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या आदेशानुसार ‘निसर्ग उद्यान’ संस्थेला हे काम देण्यात आले असून सदर संस्थेला त्यांचे बिल लवकरात लवकर मिळावे यासाठी ते आग्रही असले तरी सर्व बाबी तपासल्यानंतरच बिल देण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी स्पष्ट केले आहे.
शिवाजी पार्कवरील बाळासाहेबांच्या स्मृती उद्यानात लावलेल्या दूरांन्डा, छोटी फुलझाडे, शोभेची झाडे तसेच गुलमोहर यांची बाजारातच नव्हे तर निसर्ग नर्सरीमध्येही किंमत १० ते ६० रुपये एवढीच आहे. येथील झाडांची संख्या विचारात घेता या सर्व झाडांची एकत्रित किंमत एक लाख ३४ हजार रुपये एवढी होते. प्रत्यक्षात निसर्ग नर्सरीने पालिकेला दिलेल्या बिलामध्ये पाच लाख ८५ हजार  ५९४ रुपये किंमत लावण्यात आलेली आहे. या संस्थेने पालिकेला सादर केलेल्या बिलावर व्हॅट तसेच विक्रीकर नोंदणी क्रमांकही नाही. सदर नर्सरीची पालिकेत नोंदणी झाली असून स्थायी समितीत जरी सदर संस्थेला २८ लाख रुपये देण्याबाबतचा प्रस्ताव मंजूर झाला असला तरी छाननी झाल्याशिवाय त्यांना कोणतेही बिल दिले जाणार नाही असे पालिका आयुक्त म्हणाले. सदर उद्यान तयार करताना सीआरझेडपासून सर्व अटींचे पालन करूनच उद्यानाची निर्मिती करण्यात आली असून झाडांच्या किमती जास्त असल्यास त्यासदर्भात योग्य ती कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. पालिकेचे लेखापाल राम धस यांना विचारले असता स्थायी समितीत उद्यानाच्या खर्चाचा प्रस्ताव मंजूर झाला असला तरी उद्यान खात्याकडून झाडांच्या किमतीची छाननी केली जाईल तसेच सदर संस्थेकडे व्हॅट अथवा विक्रीकर नोंदणी क्रमांक असल्याची पडताळणी करूनच नंतर बीलाची रक्कम अदा केली जाईल, असे धस यांनी सांगितले.     
शिवसेनाप्रमुखांच्या निधनानंतर शिवाजी पार्कवर जेथे अंत्यसंस्कार करण्यात आले तेथेच त्यांचे भव्य स्मारक उभारण्याची मागणी शिवसेना नेते मनोहर जोशी यांची सर्वप्रथम केली होती. शिवसेनाप्रमुखांच्या दर्जाचे उद्यान उभारण्यासाठी पालिकेचा उद्यान विभाग समर्थ नसल्यामुळे हे काम निसर्ग उद्यान या संस्थेला देण्यात यावे, अशी लेखी मागणी स्थायी समिती अध्यक्ष राहूल शेवाळे व महापौर सुनील प्रभू यांनी पत्राद्वारे आयुक्तांना केली होती. अखेर हे काम निसर्ग उद्यानला देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी निविदा मागविण्याची अटही शिथिल करण्यात आली. २८ लाख ६७४ रुपयांच्या खर्चालाही स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
सदर निसर्ग उद्यान सस्थेने सादर केलेल्या बिलावर व्हॅट तसेच सेल्सटॅक्स क्रमांकच नसल्याचे दिसते. बाळासाहेबांच्यास्मृती उद्यानात रोपटी व अन्य झाडांसाठी पाच लाख ८५ हजार ५९४ रुपये खर्च दाखविण्यात आला आहे. स्मृती उद्यानात लावलेली डुरांन्डा, छोटी शोभेची व फुलांची झाडे आणि गुलमोहर अशी ५१३० झाडे लावण्यात आली आहेत. ‘निसर्ग उद्यान’ संस्थेकडे याच झाडांसाठीचा दर मागविले असता डुरांन्डा प्रती झाड १० रुपये, शोभेच्या झाडांची किंमत २० रुपये ते २५ रुपये, फुलझाडांची किंमत ३० ते ४० रुपये, स्पायडर ग्रास (गवत ) २५ रुपये आणि गुलमोहरची किंमत ६० रुपये असल्याचे संस्थेने लेखी दिले आहे. बाळासाहेबांच्या या स्मृती उद्यानातील एकूण झाडांचा विचार करता ही किंमत एक लाख ३४ हजार ३०० रुपये एवढी होत असताना साडेपाच लाख रुपये केवळ झाडांची किंमता दाखविण्यात आली असून निसर्गने केलेल्या कामाचे २८ लाख रुपये तात्काळ त्यांना द्यावे, काही अडचण असल्याच आपल्याशी चर्चा करावी, असे पत्र राहुल शेवाळे यांनी अतिरिक्त आयुक्त अडतानी यांना दिले आहे. या प्रकारात पालिकेची चार लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट होत असून याबाबत निसर्ग नर्सरीशी सातत्याने संपर्क साधूनही त्यांचा दूरध्वनी लागू शकला नाही तर राहूल शेवाळे प्रचारात असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येत होते.  

उद्यानातील एकूण झाडे व किमती
दूरांन्डा- २३०, झाडे-किंमत प्रती झाड १० रुपये, छोटे प्लॉवर प्लांट १३००, किंमत २५ रुपये प्रति नग, शोभेची झाडे ३५०० (एकेक फांदीसह), किंमत २५ रुपये, गुलमोहर १००, प्रतिनग ६० रुपये.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या दर्जाला शोभेसे स्मारक व्हावे, ही माझी आग्रही भूमिका होती. आम्ही काम केले तरी टीका होते आणि केले नाही तरीही टीका केली जाते. तथापि हे स्मृती उद्यान सर्वोत्तम व्हावे यासाठीच निसर्ग नर्सरीला हे काम देण्याचा निर्णय घेतला. आता या नर्सरीने झाडांच्या किमती जास्त लावल्या का, तसेच त्यांच्याकडे बीलामध्ये व्हॅट अथवा विक्रीकर नोंदणी आहे अथवा नाही,या प्रशासकीय बाबी असून त्या तपासणे हे पालिका प्रशासनाचे काम आहे. याप्रकरणी जनतेची फसवणूक होऊ नये ही माझी भूमिका आहे. झाडांच्या किमचीची खातरजमा  उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांनी करून घेतल्या पाहिजे.
– सुनील प्रभू, महापौर, मुंबई महापालिका

महापालिकेच्या भायखळा येथील जिजामाता उद्यानात अनेक सुंदर झाडे आहेत. विभागीय उद्यान कंत्राटदारही स्मृती उद्यानाचे काम करण्यास सक्षम असून त्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीतच मंजूर झालेला आहे. वेळोवेळी झालेल्या कामांची करून दाखवले अशी जाहिरात सेनेकडून करण्यात येते मग स्मृती उद्यानातील घोटाळ्याची जबाबदारी का घेण्याचे टाळले जाते? स्मृती उद्यानात साडेपाच लाख रुपयांची झाडे दाखविण्यात आली आहेत. २८ लाख रुपयांच्या या एकूणच बिलाची छाननी होणे आवश्यक आहे.
-संदीप देशपांडे, मनसे गटनेते