सत्तेत येताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘आरे’मधल्या मेट्रोच्या कारशेड बांधकामाला स्थगिती देण्याचा मोठा निर्णय घेतल्यानंतर आता ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘ड्रिम प्रोजेक्ट’ असलेल्या बुलेट ट्रेनबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय. बहुचर्चित मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा फेरआढावा घेणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना हीच ती वेळ अशी आठवण करुन दिली आहे.

कल्याण ग्रामीण मतदारसंघातून निवडून आलेल्या राजू पाटील यांनी ट्विटवरुन उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. उद्धव यांच्या नावातील अद्याक्षरे वापरुन राजू यांनी आता बुलेट ट्रेनबद्दल निर्णय घेताना यू टर्न घेऊ नका असा सल्ला दिला आहे. “आता ‘यू’ ‘ट’र्न नको! बुलेट ट्रेन साठी महाराष्ट्र सरकारला द्यावे लागणारा हिस्सा व त्यासाठी बीकेसी व इतर ठिकाणी भू संपादीत करायला लागणाऱ्या हजारो कोटी राज्याच्या इतर लोकोपयोगी कामांसाठी वापरावे.बुलेट ट्रेन प्रकल्प बासनात गुंडाळायची हीच वेळ आहे,” असं ट्विट राजू यांनी केलं आहे.

याआधीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुलेट ट्रेनला विरोध दर्शवला होता. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राज ठाकरेंनी अनेकदा या प्रकल्पाला आपल्या भाषणामधून विरोध केला आहे. “बुलेट ट्रेन हवी कशाला? ढोकळा खायला का? असा प्रश्न विचारत राज ठाकरेंनी बुलेट ट्रेनवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. मुंबई ते अहमदाबाद अशी बुलेट ट्रेन असणार आहे. यासाठी कोट्यवधी रुपयांचं कर्ज सरकारने काढलं आहे. या बुलेट ट्रेनचा वापर कोण करणार? मुंबईत गेल्या अनेक वर्षांपासून जे गुजराती बांधव स्थायिक झाले आहेत ते तरी जातील का गुजरातला? समजा बुलेट ट्रेन सुरु केली तर त्याने प्रवास कोण करणार? दोन तासात गुजरातला जाऊन काय ढोकळा खाऊन यायचं आहे का?,” असे सवाल राज यांनी उपस्थित केले होते.