शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात अयोध्यावारीची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेना भवनसमोर पोस्टरबाजी करुन शिवसेनेला डिवचले आहे. मनसेने अयोध्यावारीसाठी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देतानाच राज्यातील समस्यांसंदर्भात त्यांना काही प्रश्न विचारले आहेत.

महाराष्ट्राचे रस्ते खड्डे मुक्त होणार का ?, महागाई कमी होणार का ?, शेती मालाला भाव मिळणार का ? आणि खिशातले राजीनामे बाहेर पडणार का ? असे प्रश्न मनसेने बॅनरद्वारे विचारले आहेत.

दोन दिवसांपूर्वी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी येत्या २५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केली. दरवर्षी रावण उभा राहतो मात्र भाजपाला राम मंदिर उभारता आले नाही अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. उद्धव ठाकरे यांच्या घोषणेनंतर त्यांच्यावर विरोधकांकडून टीका सुरु आहे.

आधी बाळासाहेबांचं स्मारक बांधा, मग राम मंदिर-राणे
उद्धव ठाकरे राम मंदिर बांधण्याच्या गोष्टी करत आहेत आधी त्यांनी मुंबईत बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक बांधून दाखवावं असं नारायण राणेंनी म्हटलं आहे. तसंच निवडणुका जवळ आल्या असल्यानेच शिवसेनेला राम मंदिराची आठवण आल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

शिवसेनेला मुंबईतल्या समस्या सोडवता आल्या नाहीत. शिवसेनेचे मंत्री केंद्रात आणि राज्यात सत्तेत आहेत मग इतके दिवस राम मंदिराचा प्रश्न का उपस्थित केला नाही असाही प्रश्न नारायण राणेंनी विचारला आहे. तसंच एवढाच स्वाभिमान होता तर राजीनामा देऊन शिवसेनेचे मंत्री बाहेर का पडले नाहीत? असा सवाल राणेंनी विचारला.