करोना व्हायरस विरुद्धच्या लढाईत सरकारने वेगवेगळया उपायोजना केल्या आहेत. विविध निर्णय घेतले जात आहेत. मनसेचे नेते संदीप देशपांडे हे सरकारी निर्णयांमधील त्रुटी सोशल मीडियाच्या माध्यमातून वारंवार दाखवून देत आहेत. सरकारकडून सातत्याने वाढवण्यात येणाऱ्या लॉकडाउनवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

“कुठलेही प्रश्न न विचारता वाढणारी टाळेबंदी मान्य करणं म्हणजे राज्यकर्त्यांच्या मनातल्या सुप्त हुकूमशाहीला खतपाणी घालणं होईल” असं टि्वट संदीप देशपांडे यांनी केलं आहे. संदीप देशपांडे सोशल मीडियावर मोठया प्रमाणावर सक्रीय आहेत. लॉकडाउनच्या या दिवसात सरकारी निर्णयातला फोलपणा ते वारंवार दाखवून देत आहेत.

मनसेचा आक्रमक चेहरा असलेला नेता अशी त्यांची ओळख आहे. मागच्यावर्षी विधानसभा निवडणुकीत दादरमधून शिवसेनेच्या सदा सरवणकर यांनी त्यांचा पराभव केला. पण संदीप देशपांडे यांनी ४० हजारपेक्षा जास्त मते मिळवली होती. भारतात आता तिसरा लॉकडाउन सुरु आहे. येत्या १७ मे नंतर चौथा लॉकडाउन सुरु होईल. मुंबईत करोनाची परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही. त्यामुळे ३१ मे पर्यंत लॉकडाउन वाढवण्याची घोषणा करण्यात येण्याची शक्यता आहे.