लोकलप्रवासादरम्यान मौल्यवान वस्तू वा सामान विसरून गेलेल्या प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. प्रवाशांच्या मदतीसाठी लोहमार्ग पोलिसांनी तयार केलेल्या हेल्पलाइनवर गेल्या वर्षभरात  तीन हजार ७९६ प्रवाशांनी यासंदर्भात तक्रारी केल्याचे उघड झाले आहे.

लोहमार्ग पोलिसांनी प्रवाशांच्या मदतीसाठी १५१२ ही हेल्पलाइन सुरू केली आहे.  जानेवारी ते डिसेंबर २०२० या काळात प्रवाशांनी विविध कारणांस्तव मदतीसाठी हेल्पलाइनवर एकूण ५ हजार ८०८ वेळा संपर्क साधला होता. त्यात विसरभोळ्या प्रवाशांची संख्या मोठी होती. डब्यात राहून गेलेली बॅग वा अन्य वस्तू परत मिळविण्यासाठी सुमारे तीन हजार ७९६ जणांनी हेल्पलाइनवर संपर्क साधला आहे.

या काळात रेल्वेत सापडलेल्या २५८ मौल्यवान वस्तू आणि १ हजार ०४१ बॅग पोलिसांच्या मदतीने संबंधित प्रवाशांना परत करण्यात आल्या. खरेदी के लेल्या वस्तू, कार्यालयीन बॅग, तसेच महत्त्वाच्या कागदपत्रांची पिशवी इत्यादींचा त्यात समावेश होता. काही वस्तू रेल्वेकडे जमा आहेत. यात काही महत्त्वाच्या वस्तू आहेत. त्यामुळे संबंधित व्यक्तींचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली. लोकल डब्यांबरोबरच फलाटांवर बेवारस वस्तूही सापडतात. एखादी बेवारस वस्तू दिसली तर सतर्क असलेल्या प्रवाशांकडून हेल्पलाइनवर संपर्क साधून त्याची माहिती दिली जाते. त्या माहितीनुसार घटनास्थळी जाऊन वस्तू तपासली जाते. अशा प्रकारचे १९८ कॉल हेल्पलाइनवर करण्यात आले आहेत. संशयित प्रवासी, तृतीयपंथी, लोकल प्रवासात भजन व गाणी गाणारे, पाकीट चोरी, मोबाइल चोरी, रेल्वे कर्मचाऱ्यांकडून प्रवाशाशी गैरवर्तवणूक यांविषयीही लोहमार्ग पोलिसांच्या हेल्पलाइनवर तक्रोरी येतात. परंतु त्याचे प्रमाण फारच नगण्य आहे.

अपंग व महिला प्रवाशांचाही संपर्क

लोकलमधील अपंगांच्या राखीव डब्यातून सामान्य प्रवासी, तर महिला डब्यातून पुरुष प्रवासी प्रवास करण्याचे प्रकार नेहमीच घडतात. यामुळे बरेच वाद होतात.  याविरोधात कारवाईचा बडगाही उचलला जातो. तरीही हा प्रश्न अद्याप पूर्णपणे सुटलेला नाही. अपंगांच्या डब्यात सामान्य प्रवाशांनी शिरकाव केल्याने त्याविरोधातही हेल्पलाइनवर वर्षभरात ३२४ दूरध्वनी आले आहेत. महिला डब्यात घुसखोरीविरोधात १४२ दूरध्वनी आल्याचे सांगितले.

दूरध्वनी करण्यास कारण की..

दूरध्वनीचे कारण       संख्या

गैरहजर रेल्वे पोलीस २५

भिकारी, गर्दुल्ल्यांविरोधात    २०

दारू पिऊन प्रवास    ३९

रेल्वे स्थानकात

अज्ञात व्यक्ती सापडणे   १०

फेरीवाल्यांविरोधात   २९

जखमींच्या मदतीसाठी    १०१

बेपत्ता  प्रवासी  ५३

दूरध्वनीचे कारण    संख्या

विनयभंग   १०

पत्ते खेळणाऱ्यांविरोधात  ०४

भांडण-वादविवाद ४०

आजारी प्रवासीविषयी १०१

लोकलवर दगडफे क  १२

स्टंटबाजी   १३

ट्रेनविषयी माहिती ४८

अन्य चोरी  ४३