मुंबई ते दिल्ली हा प्रवास अवघ्या १० ते १२ तासात होणे आता शक्य होणार आहे. कारण दिल्ली ते मुंबई द्रुतगती मार्गाचे काम हाती घेतले जाणार असून ते पुढील तीन वर्षात पूर्ण होईल अशी घोषणा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली. वाहतूक व्यवस्थापन या विषयावर ‘लोकसत्ता बदलता महाराष्ट्र’ या मंचावर विचारमंथन झाले. पहिल्या दिवसात झालेल्या तीन चर्चासत्रांचा समारोप केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केला. त्याच समारोप कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली.

या कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी महाराष्ट्राबाबतही भाष्य केले. महाराष्ट्रासाठी ४.२८ लाख कोटी मंजूर केले आहेत. महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्ग सिमेंटचे आहेत त्यांच्याकडे १०० वर्षे पाहण्याची गरज नाही. महाराष्ट्रात जमीन विकत घ्यायची असेल तर पाच पट मोबदला द्यावा लागतो त्यामुळे इथे जमीन घेणे परवडत नाही. महाराष्ट्रात २५० रेल्वे ब्रिज आम्ही उभारतो आहोत यासाठी केंद्र सरकार अर्धे पैसे खर्च करणार आहे. बडोदा ते मुंबई रस्ता आम्ही बांधतो आहोत. तर दिल्लीतही १५ मार्चपासून रिंग रुटचे काम सुरु होईल. आत्ता दिल्लीत शिरण्याची गरज उरणार नाही, अन्य राज्यात थेट जाता येणार आहे असेही गडकरी यांनी सांगितले.

जलमार्ग विकसित करण्यासाठी मराठी लोकांनी पुढे यायला हवे असेही आवाहन नितीन गडकरी यांनी ‘लोकसत्ता विचारमंथन’ कार्यक्रमात केले. मुंबई-अंदमान क्रूझ सेवा सुरु करण्याचा आमचा विचार आहे. येत्या पाच वर्षात मुंबईत ७०० क्रूझ येतील असा अहवाल आहे. जलवाहतुकीमुळे खर्च बऱ्याच अंशी कमी होतो. त्यामुळे जलवाहतुकीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ‘सी प्लेन’ तयार करण्याचाही आमचा विचार आहे. ती सेवा सुरु झाल्यास चौपाटीवरून सात मिनिटात नवी मुंबई विमानतळावर पोहचता येईल. १ एप्रिल पासून मुंबईतील भाऊचा धक्का ते मांडवा रो-रो सेवा सुरु करतो आहोत असेही गडकरींनी सांगितले.

मुंबईबाबतही भाष्य

मुंबईतील मिठी नदी आणि समुद्र स्वच्छ होणे खूप आवश्यक आहे. विजेवर चालणारी गाडी स्वस्त पडते, त्यामुळे बेस्ट इलेक्ट्रिक बसचा पर्याय स्वीकारला पाहिजे. सध्याचा खर्च १७८ रुपये प्रति किलोमीटर आहे. जर बेस्टने इलेक्ट्रिक बसचा पर्याय स्वीकारला तर हा खर्च ५० रुपये प्रति किलोमीटर इतका कमी होईल. विदेशात इथेनॉल वापरले जाते. मात्र विजेवर चालणारी गाडी आणखी स्वस्त पडते. इथेनॉलमुळे प्रदूषण कमी होते. त्यामुळे विदेशात इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांची निर्मिती होते आहे. इथेनॉलसोबत मिथेनॉलचाही वापर व्हायला हवा. टू व्हिलर टॅक्सी सुरु करण्याचा विचार आहे. प्रदूषण मुक्त परिवहन आणि अर्ध्या किंमतीत वाहन अशी वाटचाल करायची आहे असेही नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.