अगदी एक्स्प्रेस वे नं गेलं तरी मुंबई पुणे अंतर तीन तासांचं आहे जे २५ मिनिटांवर आणण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. फडणवीस सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून त्यांनी व्हर्जिन हायपरलूपच्या नेवाडा टेस्ट साइटला भेट दिली. तसेच या कंपनीच्या सीईओंना व संचालक मंडळाशीही मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली आहे.

मुंबई – पुणे दरम्यान हायपर लूप ट्रेन मार्ग उभारण्यासंदर्भात महाराष्ट्राशी व्हर्जिन हायपरलूप वन या कंपनीनं सहा महिन्यांपूर्वी करार केला होता. मुंबई पुणे हे अंतर हायपरलूप या अद्ययावत तंत्रज्ञान असलेल्या मार्गान अवघ्या 20 ते २५ मिनिटात पार करता येऊ शकतं. मुंबईमध्ये मॅग्नेटिक महाराष्ट्र समिटसाठी हायपरलुपचे रिचर्ड ब्रॅन्सन आले होते त्यावेळी त्यांनी या प्रवासाचं भाडं विमानप्रवासाइतकं असेल अस सांगितलं होतं.

आता या प्रकल्पाच्या शक्यतेसंदर्भात अभ्यास करण्यासाठी व्हर्जिन हायपरलूपवनचे तंत्रज्ञ लवकरच पुण्याला भेट देणार आहेत. हायपरलूपसाठी पीएमआरडीएने १५ किलोमीटरचा चाचणी ट्रॅक कुठे असेल याचं स्थानही निश्चित केलं आहे. विशेष म्हणजे हायपरलूपच्या उभारणीतील ७० टक्के भाग महाराष्ट्रातूनच विकत घेतला जाणार आहे, असं महाराष्ट्र सरकारनं म्हटलं आहे.
विजेवर चालणाऱ्या हायपरलूपमुळे एक्स्प्रेस वेवरील ताण कमी होईल. तसेच दरवर्षी दीड लाख टन इतकं वायू प्रदुषण कमी होईल असंही सरकारनं म्हटलं आहे.

या प्रकल्पासाठी 20 हजार कोटीं रुपयांचा खर्च अपेक्षित असून दुसऱ्या कुठल्याही पर्यायापेक्षा हा स्वस्त पर्याय असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या हायपरलूपचा मार्ग थेट नवी मुंबईतील नवीन आंतरराष्ट्रीय विमातळाच्या आतमधून करण्याचा प्रस्ताव असून त्यामुळे एकूण प्रवासाचा वेळ वाचू शकतो. दरवर्षी 15 कोटी प्रवाशांना वाहून नेण्याची क्षमता या हायपरलूप ट्रेनची असेल. हायपरलूप ट्रेनमुळे दरवर्षी प्रवाशांच्या 9 कोटी तासांच्या वेळेची बचत होईल असं गणित मांडण्यात आलं आहे.