ठाकुर्ली येथे आठ तासांचा महा-मेगाब्लॉक ; ट्रान्स हार्बर व पश्चिम रेल्वेवरही ब्लॉक
ठाकुर्ली येथील नव्या प्लॅटफॉर्मच्या अंतिम टप्प्यातील काम करण्यासाठी मध्य रेल्वेतर्फे रविवारी ठाकुर्ली स्थानकाजवळ आठ तासांचा महा-मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्याशिवाय ट्रान्स हार्बर व पश्चिम रेल्वे या मार्गावरील महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी कामांसाठीही मेगाब्लॉक घेतले जाणार आहेत. पश्चिम रेल्वेवर घेण्यात येणारा हा रविवारचा मेगाब्लॉक पश्चिम रेल्वेवरील हजारावा मेगाब्लॉक आहे. ठाकुर्ली येथील महा-मेगाब्लॉकमुळे मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील वाहतूक विस्कळीत राहणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचा हा रविवार पूर्णपणे ‘ब्लॉक’ होण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेने हार्बर मार्गावर कोणत्याही ब्लॉकचे नियोजन केलेले नाही. ठाकुर्ली येथील ब्लॉकचे काम पूर्ण झाल्यावर येथील नवीन प्लॅटफॉर्म प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहे.
ठाकुर्ली येथील महा-मेगाब्लॉक
कुठे – डोंबिवली ते कल्याण यांदरम्यान डाऊन धिम्या मार्गावर
कधी – सकाळी ९.२० ते संध्याकाळी ५.२० वा.
परिणाम – ब्लॉकदरम्यान दिवा ते कल्याण यांदरम्यान अप व डाऊन धिम्या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद असेल. त्यामुळे कल्याणकडे जाणाऱ्या धिम्या गाडय़ा मुंब्रा स्थानकापासून डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील. या गाडय़ा ठाकुर्ली आणि कोपर या स्थानकांवर थांबणार नाहीत. सीएसटीहून सुटणाऱ्या डोंबिवली लोकल मात्र डोंबिवलीपर्यंत पूर्णपणे धिम्या मार्गावर धावतील.
ट्रान्स हार्बर
कुठे – ठाणे ते नेरुळ/वाशी यांदरम्यान अप व डाऊन मार्गावर
कधी – सकाळी ११.३० ते दुपारी २.३० वा.
परिणाम – ब्लॉकदरम्यान म्हणजेच सकाळी १०.४५ ते दुपारी २.४० या कालावधीत ट्रान्स हार्बर मार्गावरील दोन्ही मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद राहील. या मार्गावरील प्रवाशांना हार्बर तसेच मुख्य मार्गावरून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.
पश्चिम रेल्वे
कुठे – मरीन लाइन्स ते माहीम यांदरम्यान डाऊन धिम्या मार्गावर
कधी – सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वा.
परिणाम – ब्लॉकदरम्यान चर्चगेट ते माहीम यांदरम्यान डाऊन धिम्या मार्गावरील वाहतूक डाऊन जलद मार्गावरून चालवली जाईल.