लंडन येथील बकिंगहॅम पॅलेसच्या धर्तीवर महाराष्ट्र पोलीस मुख्यालयात ‘चेंज ऑफ गार्ड’ ही अभिनव संकल्पना येत्या महाराष्ट्र दिनापासून सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

‘युनायटेड किंगडम’च्या ‘बकिंगहॅम पॅलेस’ येथे सुरक्षारक्षकांचे अत्यंत प्रेक्षणीय असे ‘चेंज ऑफ गार्ड’ हे प्रात्यक्षिक होत असते. आठवड्यातील ठराविक दिवशी होणारे हे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी स्थानिक जनतेसह जगभरातील पर्यटक उपस्थित राहतात. अशा प्रकारचे प्रात्यक्षिक पोलीस महासंचालक कार्यालय (पोलीस मुख्यालय) येथे झाल्यास हे येथील नागरिकांसह मुंबईस भेट देण्यासाठी येणाऱ्या देश,विदेशातील पर्यटकांसाठी मोठे आकर्षण ठरेल.

गृहमंत्री अनिल देशमुख आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी पोलीस महासंचालक कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी या विषयाच्या अनुषंगाने झालेल्या चर्चेत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला. याचबरोबर शहीद जवानांच्या सन्मानार्थ पोलीस मुख्यालयात ‘शहीद गॅलरी’ (मार्टिर्स गॅलरी) स्थापन करण्याचेही यावेळी निश्चित करण्यात आले.

येणाऱ्या १ मे पासून दर रविवारी ‘चेंज ऑफ गार्ड’ पोलीस मुख्यालयासमोरील प्रांगणात आयोजित केले जाणार आहे. एका पाळीतील सुरक्षारक्षक आपला कार्यभार दुसऱ्या पाळीतील सुरक्षारक्षकांकडे सोपवितात अशी ‘चेंज ऑफ गार्ड’ ची संकल्पना आहे. हे सुरू असताना पोलीस बँडची धून व सोबतीला आकर्षक परेडचे दृश्य आता मुंबईकरांनाही अनुभवता येणार आहे.