२८ सप्टेंबरला संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई : विमानवाहू युद्धनौकांच्या देखभाल दुरुस्तीसाठी नौदलाची देशातील सर्वात मोठी ‘सुकी गोदी’ मुंबई नौदल गोदी येथे बांधण्यात आली आहे. पाण्यातच बांधलेली ही देशातील पहिलीच सुकी गोदी आहे. या गोदीचे उद्घाटन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते २८ सप्टेंबरला होणार आहे.

या गोदीमध्ये एकाच वेळी तीन जहाजांना सामावून घेणे शक्य होणार आहे. त्यासाठी २८१ मीटरच्या गोदीमध्ये ९०, १३५ आणि १८० मीटर अंतरावर वेगवेगळे भाग करण्यात आले आहेत. भारतीय नौदलाची शान असणारी सर्वात मोठी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रमादित्य देखील या गोदीत सामावू शकते. मुंबईतील नौदलाची सध्याची सुकी गोदी ही वाढत्या नौकांना सामावून घेण्यास अपुरी पडत असल्यामुळे नवीन गोदी बांधण्याचा तसेच सध्याच्या मुंबई नौदल गोदीच्या नूतनीकरणाचा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. त्या अंतर्गतच ही नवीन सुकी गोदी बांधण्यात आली. सुकी गोदी बांधकामासाठी सुमारे एक हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च झाला आहे.

देशातील नौदलाच्या तसेच व्यापारी वापराच्या खासगी गोदी या सर्वच जमिनीवर बांधल्या आहेत. मात्र मुंबई नौदल गोदी येथे जमीन उपलब्ध नसल्यामुळे ही सुकी गोदी थेट पाण्यातच बांधण्यात आली. पाण्यातील सुक्या गोदीचे बांधकाम देशात यापूर्वी झालेले नसल्यामुळे संकल्पनेच्या मूळ रेखाटनापासून सर्वच बाबी नव्याने करण्यात आल्या. जमिनीवरच १५ मीटर उंचीचे ‘कैजन ब्लॉक’ (काँक्रीटचे ठोकळे) बांधून मग ते समुद्रात नेऊन पाण्यातील खडकाळ पायावर काँक्रीटचा वापर करून बांधकाम करण्यात आले. या कैजन ब्लॉकवर पाण्यातच पुन्हा बांधकाम करून त्यांची उंची समुद्रतळानुसार वाढवण्यात आली. समुद्रतळापासून सरासरी १९ मीटरचे ३८ कैजन गोदीच्या बांधकामात वापरले आहेत.

सुक्या गोदीच्या बांधकामाबरोबरच गोदीच्या दक्षिण आणि उत्तर दिशेला जहाजे उभी करण्यासाठी सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक जहाजे, युद्धनौकांसाठी अनेक सुविधा मिळणार आहेत. जेणे करून सध्याच्या गोदीवरील ताण कमी होईल. नौदलाच्या या गोदीचे बांधकाम एचसीसी या पायाभूत सुविधा क्षेत्रातील कंपनीने केले आहे.

वैशिष्टय़े

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

*  ८१ मीटर लांब, ४५ मीटर रुंद, १७ मीटर खोल.

*  तीन जहाजे एका वेळी सामावून घेण्याची क्षमता.

*  तब्बल वीस कोटी लिटर पाणी सामावून घेण्याची क्षमता.

*  चार सेकंदाला १० हजार लिटर पाणी उपसणारे आठ पंप, अडीच तासात गोदी रिकामी करण्याची क्षमता.

*  पाच लाख मेट्रिक टन काँक्रीटचा वापर, वांद्रे-वरळी सी लिंकच्या दीडपट काँक्रीट.